मुंबई : यूपीएससी समितीच्या शिफारसीप्रमाणे पूर्णवेळ पोलीस महासंचालक नियुक्तीसाठी राज्य शासनाला आदेश देण्यात यावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तीन अधिका-यांपैकी एका अधिका-याची पूर्ण वेळ पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असून त्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. याबाबत खुलासा करुन सरकारला आदेश देण्याची मागणी वजा विनंती याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून हेमंत नगराळे, रजनीश सेठ आणि के. व्यंकटेशम या तीन भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. विद्यमान पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे नाव त्या यादीत नव्हते. तरी देखील संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदाचा ‘अतिरिक्त कार्यभार’ देण्यात आला आहे. पांडे यांना जून 2022 पावेतो मुदतवाढ दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सदर नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अॅड. दत्ता माने यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राज्य सरकारसह मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह यूपीएससी आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.