खून करुन आझाद असल्याचे मद्याच्या नशेत बोलला— अशोकच्या हत्येचा तपास अखेर आठ वर्षांनी लागला!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वाल्मिक रमेश चौधरी लहान असतांनाच त्याच्या वडीलांनी दुसरे लग्न केले होते. दुस-या पत्नीसोबत अर्थात वाल्मिकच्या सावत्र आईसोबत त्याचे वडील त्यांच्या मुळ गावी कुसुंबा येथे रहात होते. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर वाल्मिक त्याच्या आईसोबत गुजरात राज्यातील सुरत येथे राहण्यास आला. त्यांची आईनेच त्याला आईसह बापाचे प्रेम दिले. सुरत शहरातील पांडेसरा येथे दोघे मायलेक मोलमजुरी करुन दिवस काढू लागले.

वाल्मिकची आई गिरणी कामगार होती. गिरणीत कामाला जाऊन ती वाल्मीकाचे पालन पोषण करत होती. वाल्मिक दिवसेंदिवस मोठा होत गेला. अशिक्षित वाल्मिकला कमी अधिक प्रमाणात शहाणपण आल्यानंतर त्याने देखील लवकरच मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. कारखान्यात मशीनवर काम करुन त्याने आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी घेतली होती.  जळगाव जिल्ह्याशी वाल्मिक व त्याच्या आईची नाळ जुळलेली होती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे वाल्मिकच्या आईचे माहेर तर जळगाव हे त्याच्या काकांचे गाव होते. त्यानिमित्ताने अधूनमधून जळगाव आणि पाचोरा येथे वाल्मिक व त्याच्या आईचे येणे जाणे सुरु होते. बालपणापासून मोलमजुरी करत मोठा झालेल्या अशिक्षित वाल्मिकला देशी विदेशी मद्यप्राशन करण्याची आवड होती.

वाल्मिकची आई गिरणीत कामाला जात होती. त्याठिकाणी अशोक यादव नावाचा उत्तर भारतीय कामगार होता. सन 2013 मध्ये आपल्या बोलीबच्चनच्या आधारे अशोक यादव याने वाल्मिकच्या आईवर आपले प्रेमाचे जाळे फेकले. त्या जाळ्यात स्वभावाने गरीब असलेली वाल्मिकची आई पुरती फसली. वाल्मिक व त्यांची आई रहात असलेल्या घराजवळच गांधीनगर झोपडपट्टीत अशोक रहात होता. स्वभावाने तापट असलेला अशोक यादव वाल्मिकच्या आईवर रुबाब करत असे. त्याची आई त्याला घाबरली म्हणजे वाल्मिक देखील त्याला वचकून रहात होता. गिरणीत कामावर गेल्यानंतर तो तिला कुणाशी बोलू देत नव्हता. तो तिच्यावर वर्चस्व गाजवण्याची एकही संधी सोडत नव्हता. ती कुणा परक्या व्यक्तीसोबत बोलली म्हणजे अशोक तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. समजावण्यास गेल्यावर तो वाल्मिकच्या आईवर भलता रुबाब करत असे. त्यामुळे वाल्मिक व त्यांची आई दोघे मायलेक त्याला घाबरुन दिवस काढत होते. त्यामुळे वाल्मिकच्या मनात अशोक यादव याच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला होता.  अशोक आपल्या कब्जात नेहमी एक चाकू बाळगत असे. त्या चाकूच्या धाकावर तो वाल्मिकसह त्याच्या आईला धाकात ठेवत होता. तसेच भर रस्त्यात त्याच्या आईची छेड देखील काढत होता. 

अशोकच्या या रोजच्या त्रासाला वैतागून अशोकचा गेम करण्याचे वाल्मिकने मनाशी ठरवले. मद्याचा शौकीन असलेला वाल्मिक मधुशाळेत अर्थात दारुच्या गुत्त्यावर बिनचूक हजेरी लावत असे. त्यामुळे त्याच्यासारख्या काही नियमित मद्य खरेदीदारांसोबत त्यांचा परिचय झाला होता. पिंटू व राजू टकल्या हे दोघे मद्य खरेदी करणारे नियमित ग्राहक होते. पिंटू व राजू टकल्या हे दोघे काय करतात, कुठे राहतात याबाबत वाल्मिकला माहिती नव्हती. मात्र मधुशाळेत अर्थात दारुच्या दुकानावर त्यांची नेहमी भेट होत असे. त्यातून दोघे त्याचे मित्र झाले होते. अशोकच्या त्रासाबद्दल वाल्मिकने या दोघांजवळ आपली व्यथा कथन केली. अशोकला या जगातून कायमचे नाहीसे करायचे असल्याचे वाल्मिकने या दोघांजवळ बोलून दाखवले. याकामी त्याने दोघांजवळ मदत मागितली.   

सन 2014 चा तो काळ होता. या कालावधीत वाल्मिकने दोघा मद्यप्रेमी मित्रांना जवळ केले. त्यांच्याशी जवळीक निर्माण केली. दोघांना चांगले खाण्यापिण्यास दिले. “जब मिल बैठेंगे तीन यार” असे म्हणत तिघे मित्र सोबतच मद्यपानाचा आस्वाद लुटू लागले. मद्याची झिंग चढल्यानंतर अशोक यादवचा खात्मा करण्याची बुद्धी त्यांना प्राप्त झाली. ठरल्यानुसार पिंटू व राजू टकल्या या दोघांनी अशोक सोबत दोस्ती केली. हळूच त्यांच्यात वाल्मिकने शिरकाव करत चौथा सदस्य होण्याचा मान पटकावला. वरुन चांडाळ चोकडी असल्याचे चौघे दाखवत असले तरी वाल्मिकसह पिंटू व राजू टकल्या यांचे त्रिकुट होते. अशोक हा त्यांच्यात उपरा होता. त्याला संपवण्यासाठी हे तिघे एकत्र आले होते. वाल्मिक आता अशोकसोबत गोडी गुलाबीने रहात होता. तो अशोकाला देखील चांगले खाऊ पिऊ घालत होता. त्यामुळे अशोकच्या उर्मटपणाची तीव्रता आता बरीच कमी झाली होती. जळगाव जिल्ह्यात मौजमस्ती करण्याच्या उद्देशाने अशोकला घेऊन जायचे व तेथेच त्याचा गेम करायचा असे वाल्मिक व त्याच्या दोघा साथीदारांनी ठरवले होते. याकामी वाल्मिकाने दोघा साथीदारांना पाच हजार रुपये आगावू दिले होते. ठरल्यानुसार अशोकला अमळनेर येथे सोबत येण्यास तिघांनी तयार केले.

संशयित आरोपी वाल्मिक

17 मे 2014 रोजी मौजमस्ती करण्यासाठी चौघे जण सुरत येथून रेल्वेने अमळनेर येथे येण्यास निघाले. दुस-या दिवशी 18 मे च्या सकाळी चौघे जण अमळनेर रेल्वे स्टेशनवर उतरले. फ्रेश झाल्यानंतर चौघांनी नाश्ता, चहा पाणी आदी कार्यक्रम आटोपला. अमळनेर येथील वेश्या वस्तीत चौघांनी भ्रमण करत नेत्रसुखाचा आनंद लुटला. वेश्यावस्तीत भटकंती करत नेत्रसुखाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी मद्याचा आस्वाद घेण्याचे ठरवले. एका दुकानातून त्यांनी मद्याची एक बाटली खरेदी केली. त्यानंतर चौघे जण पायी पायी चालत बोरी नदीच्या मार्गे धरणगाव शहराच्या दिशेने निघाले. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना एका मंदिराजवळ घनदाट झाडी दिसून आली. या झाडा झुडुपांच्या आडोशाला बसून मद्यप्राशन करण्याचा त्यांनी विचार केला. झाडा झुडूपात नाल्याकाठी चौघांनी आपला मद्यप्राशनाचा कार्यक्रम सुरु केला.

ठरल्यानुसार तिघांनी अशोक यास मद्याचा डोस जास्त दिला. अशोकवर मद्याचा अंमल होताच त्याला झिंग चढली. तो मद्याच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर वाल्मिकने त्याच्याजवळ तो त्याच्या आई व बहिणीची छेड काढत असल्याचा विषय छेडला. या मुद्द्यावर वादाला सुरुवात झाली. शब्दामागे शब्द वाढत गेल्यानंतर तिघे मित्र अशोकवर हल्ला करण्यास एकवटले.  तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच पडलेले मोठे दगड हातात घेत तिघांनी त्याला चेह-यावर आणि डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. मद्याच्या नशेत असलेल्या अशोकचा चेहरा दगडांनी ठेचून विद्रूप करण्यात आला. त्याची ओळख पटू नये या उद्देशाने त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला व त्याला ठार करण्यात आले. तेथून जवळच असलेल्या मंगळ ग्रह मंदिराजवळ आल्यानंतर तिघांनी रिक्षाने रेल्वे स्टेशन गाठले. आल्यावर त्यांना सुरत येथे जाणारी रेल्वे मिळाली. तिघांनी त्या रेल्वेत बसून सुरत गाठले. सुरतला आल्यानंतर तिघे आपल्या आपल्या उद्योगाला लागले व दैनंदिन जीवन जगू लागले. त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिकाने दोघांना पाच हजाराची धनराशी दिली. त्यानंतर पिंटू व राजू टकल्या हे दोघे जण अशोक यास कधी भेटले नाही. दोघांसोबत वाल्मिकची ती अखेरची भेट ठरली. अशोक यादवचा कायमचा नायनाट केल्याचे वाल्मिकने त्याच्या आईच्या कानावर तिच्या माहितीसाठी आवर्जुन सांगितले.

दुस-या दिवशी 18 मे 2014 रोजी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची वार्ता परिसरात पसरण्यास वेळ लागला नाही. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे.कॉ. अशोक वामन मोरे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 62/2014 भा.द.वि. 302, 201 नुसार दाखल करण्यात आला. मयत अशोक यादव हा सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलीस तपासात देखील त्यांची ओळख पटली नाही व मारेकरी आपले दैनंदिन कामकाज करत राहिले.

या घटनेनंतर दिवसामागून दिवस जात होते. भिंतीवरील दिनदर्शिकेच्या तारखा बदलत होत्या. बघता बघता सन 2014 ते 2022 असा आठ वर्षाचा कालावधी उलटला. अशोक यादवचे मारेकरी आपल्या रोजच्या कामात व्यस्त झाले. त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकले नाही. पिंटू व राजू टकल्या हे दोघे कुठे गेले, ते कुठे राहतात याचा वाल्मिकला देखील थांगपत्ता नव्हता. वाल्मिक व त्यांची आई हे दोघे मायलेक सुरतला रहात होते. वाल्मिक देखील त्याचा मद्यपानाचा डोस नियमितपणे घेत होता. एकंदरीत सर्व काही सुरळीत सुरु होते.

मात्र सत्य लपत नाही असे म्हटले जाते. सत्य एके दिवशी बाहेर आल्याशिवाय रहात नाही. या घटनेच्या आठ वर्षानंतर 27 डिसेंबर 2021 रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी वाल्मिक मद्यपान करण्यासाठी देशी दारु अड्ड्यावर गेला. मद्यपान करतांना त्याचा तेथील दोघा जणांसोबत वाद झाला. शब्दामागे शब्द वाढत गेला. मद्याचे घोट रिचवल्यानंतर वाल्मिकच्या अंगात व शब्दात बळ आले होते. दोघांवर रुबाब करण्यासह त्यांना दम देण्यासाठी वाल्मिकने जोरात बोलण्यास सुरुवात केली. “माझ्या कुणी नदी लागू नका, आपण जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे मर्डर केला आहे”. “आजपर्यंत पोलीस आपल्याला पकडू शकले नाही व पकडणार देखील नाही”. असे तो मोठमोठ्याने ओरडून सांगू लागला. त्याचे वाक्य कुणीतरी सुज्ञ नागरिकाने ऐकले. त्या सुज्ञ नागरिकाने हा प्रकार सुरत क्राईम ब्रँचला कळवला. सुरत येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.  त्यांची नशा उतरेपर्यंत त्याला विचारपूस केली. अखेर सुरत क्राईम ब्रँच पोलिसांनी त्याला बोलते केले. आठ वर्षापूर्वी केलेल्या खूनाची कबुली त्याने दिली.  त्याच्या माहितीनुसार डिसीजी क्राईम ब्रँच सुरत येथील पोलीस उप निरीक्षक पी.एम. वाला यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधला. आठ वर्षाच्या कालावधीत उघड न झालेला खूनाचा गुन्हा दाखल आहे काय? या बाबत त्यांनी विचारणा केली. याबाबत पो.नि. जयपाल हिरे यांनी त्यांचे सहकारी हे.कॉ. संदीप धनगर यांच्या मदतीने गेल्या आठ वर्षाच्या कालावधीतील उघड न झालेल्या खूनाच्या गुन्ह्याची जंत्री उघडली. त्यात 18 मे 2014 रोजी दाखल असलेला गुन्हा त्यांच्या नजरेसमोर चमकला.

सुरत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आलेले वर्णन या गुन्ह्यासोबत अगदी जुळून आले. पो.नि. जयपाल हिरे यांनी तातडीने सुरत एलसीबीसोबत बोलणे करत या गुन्ह्याची चर्चा केली व गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तुमचा आरोपी आमच्या ताब्यात असल्याचे पलीकडून अमळनेरचे पो.नि. जयपाल हिरे यांना सांगण्यात आले. लागलीच पुढील टप्प्यात पो.नि. जयपाल हिरे यांनी आपले सहकारी स.पो.नि. राकेशसिंग परदेशी यांना सुरत येथे रवाना होण्यास सांगितले.

वाल्मिक चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील मुळ रहिवासी होता. कामधंद्यानिमित्त तो बालपणापासून सुरत येथे रहात होता. त्याला गुजराती व खानदेशातील अहिराणी या दोन्ही भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्याला अहिराणी भाषेत विचारपूस करुन खरा प्रकार उघड करण्यात आला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा वाल्मिक नंतर खरे बोलू लागला. मयत अशोक रामलाल यादव (35) ग्राम – बगेरु, थाना-बगेरु, जि. बांदा, राज्य- उत्तर प्रदेश हा वाल्मिकची आई काम करत असलेल्या कंपनीत काम करत होता. अनैतिक संबंध ठेवण्यासाठी अशोक यादव हा वाल्मिकच्या आईवर दडपण टाकत होता. तो वाल्मिक व त्यांची आई या दोघांना त्रास देत असे. आई व बहिणीची छेडखानी करत असल्यामुळे वाल्मिकच्या मनात अशोक बद्दल राग होता. त्यामुळे वाल्मिकने पिंटू व राजू टकल्या यांच्या मदतीने अशोक यादवची अमळनेर येथे हत्या केली. तब्बल आठ वर्षानंतर या हत्येचा उलगडा झाला. दारुच्या नशेत आपण खून केला असल्याचे तो बरळला व पोलिसांच्या तावडीत अडकला. आठ वर्षांनी त्याला पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, चाळीसगाव परिमंडळ अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जयपाल हिरे व त्यांचे सहकारी स.पो.नि. राकेशसिंह परदेशी यांनी या तपासाला गती दिली. त्यांना पोलीस अंमलदार संदीप धनगर, पो.ना. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिध्दांत सिसोदे व राहूल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here