पुणे : सोळा वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर खून व त्यानंतर देखील तिच्या शरीरावर कंपासमधील कर्कटकने पंचवीस ठिकाणी ओरखडे करत जखमा करणा-या आरोपी तरुणास जन्मठेप व दहा हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी सदर निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीचे नाक व तोंड दाबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाला होता.
आकाश नाथा कोळी (19) रा. पाषाण,पुणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिकवणी आटोपून घरी परत जाणा-या अल्पवयीन मुलीसोबत 8 सप्टेबर 2012 रोजी हा प्रकार घडला होता. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी न्यायालायीन कामकाज पाहिलेल्या या या खटल्यात एकूण 19 साक्षीदार तपासण्यात आले. दत्ता अंगारे या नोडल अधिका-यांची साक्ष महत्वाची ठरली. घटनेच्या दुस-या दिवशी सकाळी मुलीचा मृतदेह पाषाण परिसरातील डीएससी क्वार्टरच्या मोकळ्या जागी आढळून आला होता. घटनेच्या दिवशी मुलगी घरी परत आली नसल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
घटनेच्या वेळी आरोपी आकाश कोळी याने पिडीतेची वाट अडवत तिच्यावर प्रेम व्यक्त केले. मात्र मुलीने त्याला नकार देताच संतापलेल्या आरोपी कोळीने तिला झाडाझुडूपात नेत तिचे नाक, तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेत तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर देखील त्याने तिच्या कंपासमधील कर्कटकने तिच्या अंगावर 25 ठिकाणी जखमा केल्या होत्या.