कोरोनाने आवरली ढोलकीची थाप, घुंगराचा नाद– लोककलावंत घालतात सरकारला मदतीची साद!!

कोरोनाचे सावट दूर होत असल्याचे चित्र दिसत असतांना पदरात दोन पैसे पडतील अशी आशा तमाशा फड मालकासह लोक-कलावंत मनाशी बाळगून होते. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंधात वाढ झाली आहे. त्यामुळे तमाशा फड मालकासह लोककलावंतांच्या आशेची निराशा झाली आहे.

जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीपासून गावोगावी यात्रांचा हंगाम सुरु होत असतो. या यात्रेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. यात्रेतील तमाशाचे फड हे लोककलेचे माध्यम असून त्या माध्यमातून फड मालकासह लोककलावंतांना रोजगार मिळत असतो. यात्रेला आलेल्या लोकांचे मनोरंजन आणि तमाशा कलावंतांचे अर्थार्जन होत असते. कोरोना संकटामुळे अनेक कलावंतांनी नाईलाजाने उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधले. अनेकांनी शेतात मजुरीने जाण्यास सुरुवात केली. अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून होणारे अर्थार्जन हातातून गेल्याचे शल्य कलावंतांना बोचत आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेने फड मालकांसह कलावंतांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला आहे. कोरोनाची लाट नाहीशी होण्याच्या बेतात असल्याने फड मालक लगबगीने कामाला लागले होते. अनेकांकडून त्यांनी सुपा-या घेतल्या होत्या. कलावंतांनी रंगीत तालीम सुरु केली होती.

कित्येक वर्षांपासून ग्रामीण लोकजीवनात मनोरंजनासाठी तमाशाला एक आगळे वेगळे स्थान राहिले आहे. आजही ग्रामीण भागातील यात्रेत तमाशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात तमाशाचा फड लागला नाही. त्यामुळे तमाशावर अवलंबून असलेल्या नर्तकी, ढोलकीवादक, सोंगाड्या, नाच्या, सरदार, मजूर, हार्मोनियम वादक अशा एक ना अनेक कलावंतांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. कधी काळी मोठा थाट बाळगणा-या नर्तकींना वृद्धापकाळात पैशांची चणचण भासत आहे. अनेक महिला कलावंतांनी धुणीभांडी करण्याचे काम सुरु केले आहे. पुरुष कलावंतांनी बांधकामावर जाण्यास सुरुवात केली आहे. एकट्या धुळे जिल्ह्यात सोळा तमाशा मंडळ आहेत. प्रत्येक तमाशा मंडळात सर्व मिळून किमान पन्नास जण कार्यरत असतात. शासनाकडून मदत मिळावी अशी या लोककलावंतांची रास्त अपेक्षा आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here