ट्विटच्या माध्यमातून आ. नितेश राणे यांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई – राज्यात कोरोनाच्या माध्यमातून जनतेची लुटमार करण्याचे धंदे जोरात सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर केला जात आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडीओ व्हायरल करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कुपर हॉस्पिटलच्या दोघा डॉक्टरांमधील हा संवाद असल्याचा दावा त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मुंबईच्या कुपर हॉस्पिटलच्या दोघा डॉक्टरांमधील हा संवाद आहे. त्यामुळे आम्ही वारंवार जे सांगतो ते पुन्हा एकवेळा खरे झाले आहे. कोरोनाच्या नावाखाली राज्य शासन पैसे कमविण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील जोडला आहे. या व्हिडीओत दोन सहकारी डॉक्टर एकमेकांसोबत संवाद साधत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळते.
या व्हिडीओत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या नावाखाली सद्ध्या धंदा सुरु आहे. क्वारंटाईन सेंटर, कोविड सेंटरच्या माध्यमातून सुमारे २५ ते ३० कोटी रुपये खर्च करुन महापालिकेचा निधी संपवून टाकला आहे. आम्ही, डीन कोविड सुविधा केंद्रात गेल्यावर पाहतो की हे काय चालू आहे? हा निव्वळ धंदा सुरु आहे, सरकारला कोरोना संपवायचा नाही, कोरोना संपवला तर धंदा बंद होईल. कोरोनाच्या माध्यमातून स्वत:चे अर्थकारण भरले जात आहे. त्यांना जगाच्या अर्थकारणाशी काहीही देणेघेणे नाही. पैसा खर्च केला आहे तो आला पाहिजे अशा पद्धतीने राजकीय नेते वागत असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे.
यापूर्वीदेखील नितेश राणे यांनी ठाकरे पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना रुग्णांना बेड्स देखील उपलब्ध होत नाही. हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही. तसेच दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी यांच्याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगितले जाते. मग हे बेड्स खरोखरच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता कोविड सेंटर कशी काय उभारली जात आहेत.
त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत मात्र बाकीच्या उपकरणांचे काय? डॉक्टर, नर्स अशा विविध सुविधांचे काय? हे कुणाच्या सांगण्यावरुन होत आहे? मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर केली जात आहे. या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. रात्री आठ वाजेनंतर ज्या लोकांसोबत बसतात त्यांना खुश करण्यासाठीच हे सुरु आहे का? असा सवाल देखील भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.