अमरावती : चाकूचे सपासप बारा वार करत पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने आजीवन सश्रम कारावासासह पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. कमलेश अजाबराव घुले (37) रा. येळेगाव, ता. कारंजा लाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत 16 फेब्रुवारी 2019 रोजी घडलेल्या या घटनेच्या दिवशी तक्रारदार एकनाथ पांडुरंग बघेकर (रा. आदर्शनगर, अमरावती) हे घरी नव्हते. त्यांची मुलगी जया, तिची दोन मुले असे तीन जण घरात होते. जयाचा पती कमलेश सायंकाळी घरी आल्यानंतर त्याने जयावर चाकूचे बारा घाव घालत पलायन करण्यात यशस्वी झाला होता. या घटनेत ज्या मृत्युमुखी पडली होती. तिच्या मुलीने हा घटनाक्रम एकनाथ बघेकर यांना कथन केला होता. जयाला रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अँड. मिलिंद शरद जोशी यांच्या वतीने पाच साक्षीदारांची तपासणी झाली. साक्षी पुराव्यांअंती न्यायालयाने कमलेश अजाबराव घुले यास आरोपी सिद्ध करत आजीवन सश्रम कारावास व 25 हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. अपील कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम आरोपीच्या लहान मुलांना नुकसान भरपाईच्या रुपात देण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सहायक फौजदार सतीश हिवे आणि पोलीस नाईक अरुण हटवार यांनी पैरवी म्हणूक कामकाज पाहिले.