अहमदनगर : पाटपाण्याच्या वादातून झालेल्या मारामारी व हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चित्तरंजन रामचंद्र घुमरे (31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (35) रा. भातकुडगाव ता. शेवगाव अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
सामनगाव चौफुलीवर मुळा नदीतील पाण्याच्या पाटचारी पुलावर या दोघांनी ज्ञानेश्वर नागरगोजे (23) या तरूणास मारहाण केली होती. दरम्यान ज्ञानेश्वर हा पाटात जवळपास दहा फूट उंचीवरुन कोसळून खाली पडला. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर जखम झाल्याने तो जागीच बेशुध्द पडला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अति. सरकारी वकील अँड. पुष्पा कापसे-गायके यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.