यवतमाळ : वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी जमा केलेल्या मौल्यवान मुद्देमालाची खोटी नोंद घेत अफरातफर केल्याप्रकरणी यवतमाळ न्यायालयातील तत्कालीन कार्यालय अधिक्षकासह लिपिकास सात वर्ष शिक्षा व सतरा हजार रुपयांचा द्रव्यदंड सुनावण्यात आला आहे. बळीराम बेतवार (62) (तत्कालीन न्यायालय कार्यालयीन अधीक्षक) रा. न्यायालयीन सोसायटी तर प्रमोद शेळके (61) (तत्कालीन लिपिक) रा. उमरसरा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी दिलीप थोरात यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
20 डिसेंबर 2004 ते 2 जून 2007 दरम्यान वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी मौल्यवान मुद्देमाल न्यायालयात जमा केला होता. या मुद्देमालाची खोटी नोंद घेत बेतवार आणि शेळके या दोघांनी पदाचा दुरुपयोग केला. संगनमताने दोघांनी आपल्या फायदा होण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करत 68 हजार 250 रुपयांची अफरातफर केली.
यवतमाळ मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक बंडू रईच यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला 31 मार्च 2009 रोजी गुन्हा दाखल केला होता. दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सारंग नवलकर आणि किशोर मेश्राम यांनी या प्रकरणी तपास पूर्ण केला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी दिलीप थोरात यांच्या समक्ष न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुरावे आणि सरकारी वकील अँड. व्ही. आर. खैरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत निकाल जाहीर करण्यात आला. बळीराम बेटावर आणि प्रमोद शेळके या दोघा आरोपींना सात वर्षांची शिक्षा व सतरा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. कलम 409 नुसार सात वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रूपये दंड, कलम 467 नुसार सात वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रूपये दंड, कलम 468 नुसार 7 वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड, कलम 471 नुसार 2 वर्ष शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी सजा या प्रकरणी सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. सुनावण्यात आलेली शिक्षा दोघांनी एकत्रितपणे भोगायची आहे. कोर्ट पैरवी अधिकारी दिलीप गुल्हाणे आणि अनिल भगत यांनी या खटल्यात सहकार्य केले.