राजस्थानचा सत्तासंघर्ष; कॉंग्रेसचा भाजपावर घोडेबाजारीचा आरोप

On: July 26, 2020 12:55 PM

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाबाबत काँग्रेसने पुन्हा भाजपावर नेम साधला आहे. भाजपाकडून आमदार खरेदीच्या घोडेबाजारात कोट्यवधीच्या ऑफर दिल्या जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांनी फोनवरील काही ऑडीओ क्लीप पुरावा स्वरूपात  दाखवल्या आहेत. आता काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेते व केंद्रीय मंत्री अमित शहांवर आमदार खरेदीचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने ट्विट करतांना म्हटले आहे की, भाजपाकडे घोडेबाजारी करण्यासाठी  पैसे आहेत मात्र सामान्य जनतेला कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. याबाबत  त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना टार्गेट करण्यात आले आहे.Amit Shah’s MLA Shopping List असं त्या फोटोत लिहिले असून त्यात मध्य प्रदेश – २२, कर्नाटक -१६, गोवा – १३, मणिपूर ८, आसाम – ९ अशा विरोधी पक्षातून घेतलेल्या आमदारांची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.

सत्तेच्या लालसेपोटी भाजपा देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहे, आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा जणू काही स्वभावच झाला आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा खेळ फार दिवस चालणार नाही. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर येथे हॉर्स ट्रेडिंग, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात लोकशाहीचा अवमान, तर गुजरात, राजस्थान या राज्यात घोडेबाजाराचा प्रयत्न अशा तीव्र शब्दात काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर नेम साधला आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार भाजपकडून पाडण्यात आले. ज्योतिरादित्य शिंदे यांना बीजेपीत प्रवेश देत त्यांच्या समर्थक आमदारांना काँग्रेसविरोधी बंडखोरी करण्यास भाग पाडले. त्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पडले आणि भाजपा सरकारची स्थापना झाली. आता राजस्थानात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना हाताशी धरुन भाजपा राजस्थानात काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.

काँग्रेस आमदारांना २० ते ३० कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे.  पायलट यांनी काँग्रेस आमदारांना खरेदी करण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. सचीन पायलट व समर्थक आमदारांच्या जोरावर राजस्थानात सरकार पाडून भाजपाचे सरकार स्थापण्याचा डाव खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व आता महाराष्ट्राकडे बिजेपीचे लक्ष असल्याची जोरदार चर्चा आता सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment