अमरावती : कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेला स्वॅब घेत असतांना तरुणीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास तसेच पंधरा हजार रुपये दंड व दंडाची रक्कम भरली नाही तर दोन महिने अतिरिक्त सजा आरोपीस सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 2) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयाने सदर शिक्षा सुनावली आहे. अल्केश अशोकराव देशमुख (32) रा.पुसद असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.
पिडीत तरुणी नोकरीला असलेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमधे एक कर्मचारी 24 जुलै 2020 रोजी कोरोनाग्रस्त झाला होता. त्यामुळे तेथील इतर कर्मचारी वर्गाला 28 जुलै रोजी बडनेरा शहरातील मोदी ट्रामा केअर हॉस्पिटल येथे कोरोना चाचणीसाठी लागणारा स्वॅब देण्यासाठी जाण्यास सांगितले होते. स्वॅब घेण्याच्या ठिकाणी अल्केश देशमुख हा तरुण प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. यावेळी आरोपी अल्केश देशमुख याने पिडीतेला तुझी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याचे सांगून अजून तपासणी करावी लागणार असल्याचे सांगीतले. त्यावर रुग्णालयात महिला कर्मचारी नाही का अशी विचारणा पिडीतेने त्याला विचारले. तुम्हाला परत जायचे असल्यास जावू शकता असे उत्तर आरोपीने पिडितेला दिले होते. पिडितेसह तिच्या मैत्रीणीला आरोपी अल्केश याने एका वेगळ्या खोलीत नेले. तेथे आरोपीने पिडितेचा खासगी अवयवातून स्वॅब घेण्याचे कृत्य केले.
त्यानंतर घरी आल्यानंतर पिडीतेला संशय आला. तिने तिच्या भावाला चौकशी करण्यास सांगितले. पिडीतेच्या भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून तपास केला असता अशा प्रकारे स्वॅब घेतला जात नसल्याचे त्याला सांगण्यात आले. स्वॅब हा केवळ नाक अथवा तोंडाद्वारेच घेतला जात असल्याचे त्याला समजले. त्यानंतर पिडितेच्या मोबाईलवर काही मेसेज आले. ते मेसेज स्वॅब घेणा-या अल्केशने पाठवले होते. याप्रकरणी पिडितेने बडनेरा पोलीस स्टेशनला अल्केश विरुद्ध विनयभंगासह बलात्कार व इतर कलमानुसार तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे आरोपी अल्केश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 2) व्ही. एस. गायकी यांच्या न्यायालयात या प्रकरणी एकुण 12 साक्षीकार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत अल्केश देशमुख याला दहा वर्ष सश्रम कारावास, पंधरा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी युक्तीवाद केला.