उस्मानाबाद : पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सांगवी (बेंबळी) येथील महादेव पांडुरंग सुरवसे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुगार व दारुचे व्यसन असलेला महादेव हा त्याची पत्नी बबीताच्या चारित्र्यावर संशय घेत असे. संशयातून तो तिला मारहाण देखील करत असे.
सन 2019 मधे गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस आधी तो पत्नी बबीताला तिचा भाऊ पांडुरंग चौधरी यांच्याकडे घेऊन आला होता. त्यावेळी तो त्यांना म्हणाला होता की तुम्ही बबीताला शेवटचे बघून घ्या. त्यानंतर सांगवी येथे बबीताला आणल्यानंतर 7 एप्रिल रोजी त्याने झोपलेल्या बबीताच्या डोक्यात दगड घालून गळा आवळून ठार केले.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.आर.नेरलेकर यांनी आरोपी महादेव पांडुरंग सुरवसे यास जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अॅड. देशमुख यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.