“मीच एकट्याने ठेका घेतलाय?” राऊतांच्या प्रश्नात “ग्यानबाची मेख”

“महाराष्ट्रातील कॉंग्रेसने कोरोना काळात ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्याने देशभरात कोरोना पसरला” या पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या विधानाने राज्यभर गदारोळ माजलाय. तत्पुर्वी मविआचे एक शिलेदार संजय राऊत यांच्या “सरकार पाडण्याची ऑफर आपण धुडकावली त्यामुळे “ईडी”चा  ससेमिरा पाठीस  लावल्याच्या दुस-या गौप्यस्फोटाने या  गदारोळात भर घातली.  मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी “ या सा-यांशी  लढण्याचा ठेका  मीच  एकट्याने घेतलाय का?” असा कळीचा प्रश्न उपस्थित करुन शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस – भाजपा यांना  आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचा प्रयत्न चालवल्याचे बोलले जात आहे. 

गत आठवड्यात पोलिस बदल्या – बढत्या –  नियुक्तीवरुन भ्रष्टाचार माजल्याच्या प्रकरणात सचिन वाझे – परमबीर सिंग जोडगोळीच्या सहाय्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शिकार करण्यात आली. पोलिस अधिकारी (आयुक्त दर्जा + वरिष्ठ) नेमणूकीची  यादी गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी दिल्याची माजी मुख्यसचिव सिताराम कुंटे यांची कथित साक्ष देशमुखांना आणखी बुडवणारी ठरल्याचे दिसताच देशमुख यांनीही तात्काळ ती यादी अनिल परब यांचेकडून आल्याचे उघड केले.  या “एक्स्पोजर गेम” नंतर पुढे काय? परब हे तर मुख्यमंत्री नाहीत. मग परबा यांना  ही यादी कुणी दिली? असा दुसरा प्रश्न उपस्थित झाला. भाजपाच्या ट्रोलर्सनी तर अनिल देशमुख यांच्या जोडीला अनिल परब हे देखील तुरुंगात जाणार अशी हाकाटी पिटली.

राज्य भाजपची दुसरी आघाडी शिवसेनेच्या युवा मंत्र्यांसह  शिवसेना प्रमुख या कचाट्यातून सुटू शकत नाही असा सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत असतांनाच गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाने हा अमळ तणाव निवळला. लता दीदींच्या अंत्यविधीस धावून आलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मुख्यमंत्री उद्धवजी हात जोडून सामोरे गेले. मोदीजी यांनीही उद्धवजींच्या डाव्या हातास काहीसे थोपटून सांत्वना दिल्याचे दिसले. “डरो मत – सब कुछ ठिक हो सकता है – अगर बात मानो तो” असाच या मौनातील संवादाचा अर्थ नसावा ना” असेही बोलले जाते.

काही तासानंतर मोदीजी यांनी कॉंग्रेस पक्षावर राजकीय आघात केला. महाराष्ट्रातील कॉंग्रेसने मुंबईतल्या  गोरगरीब मजुरांना रेल्वे गाड्यांची तिकीटे  देऊन उत्तर प्रदेश, बिहारात कोरोना पसरवला असा आरोप केला. आरोप कॉंग्रेसवर झाल्याने राज्यातील कॉंग्रेस बिथरली. त्यांनी  जोरदार निषेध आंदोलन केले. हा कॉंग्रेसवरील वार असल्याने मविआतील शिवसेना व रा.कॉ. शांत बसले. याच दरम्यान भाजपाचे किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रणव राऊत आणि कुणी सुशिल पाटकर यांच्यावर शेकडो कोटी भ्रष्टाचार आरोपाची राळ उडवली. ईडीचा ससेमिरा संजय राऊत यांच्या पाठीशी लागणार असे दिसू लागताच संजय राऊत पुन्हा भडकले. केंद्र – राज्य संघर्षात “मविआ” सरकारचा गळा आवळण्याचा जोरदार खेळ होत असतांना शिवसेना प्रमुख आणि रा.कॉ. प्रमुख गप्प कसे? असा अप्रत्यक्ष प्रश्न विचारतांना या सा-यांशी लढण्याचा ठेका मीच एकट्याने घेतलाय का? असा दुसरा प्रश्न संजय राऊत यांनी फेकलाय.

संजय राऊत यांनी “सरकार पाडण्याची ऑफर” धुडकावल्यामुळे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी “ईडी”चा फेरा आपल्या मागे लावल्याचा आरोप केला. ही “ऑफर” आपण  स्विकारली असती तर “तुम्ही” सगळे घरी गेला असतात असे मतलबी मौन पाळणा-यांना राऊत यांनी परखडपणे सुनावल्याचे दिसते. “मविआ” सरकार वाचवण्यासाठी परब यांचा बळी द्यायचा की राऊत यांचाही?  असा यक्ष प्रश्न कसा सोडवला जातो त्याची प्रतिक्षा राहणार आहे.  भाजपाच्या शाऊटींग ब्रिगेडने शिवसेनेवर चौफेर हल्ले चालवले आहेत. राज्य सरकार मधील भ्रष्टाचा-यांवर शिकंजा – शिकंजा  कसला. तर  दोन मंत्र्यांसह नेतृत्व कारवाईच्या जात्यात भरडले जाईल असा तर्क दिला जात आहे. राज्यातल्या “मविआ” सरकार पाडण्याच्या ओफर्सशी संजय राऊत लढत असतांना “ईडी”चा फास संजय राऊत यांचा घास घेऊ पहात असतांना शिवसेनेचे लढवय्ये नेते, रा.कॉ. नेते गप्प कसे? केंद्र सरकार कडून महाराष्ट्राचा अपमान होत असतांना महाराष्ट्रातील भाजपा नेते गप्प का? असा प्रश्न संजय राऊत हेच विचारत आहेत. आगामी 10 मार्च नंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवला जाईल. राज्य आणि राजा सुरक्षीत राखण्यासाठी सेनापतींसह प्याद्यांचा बळी देण्याची खेळी करणे किंवा नवी सेटलमेंट घडवणारी मांडवली यापैकी एक घडेल. तुर्त इतकेच.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here