चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी वृद्धाला जन्मठेप

अकोला : चॉकलेट घेण्यासाठी आलेल्या पाच वर्ष वयाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणा-या साठ वर्षाच्या वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायलयाने हा निकाल दिला आहे. पातूर तालुक्यातील सस्ती येथील रहिवासी गजानन शिवाजी गवई असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या वृद्ध आरोपीचे नाव आहे.

28 नोव्हेंबर 2019 रोजी पीडित बालिका गजानन शिवाजी गवई याच्या दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी आली होती. आरोपीने तिला दुकानात बोलावून तिचा विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. झालेला प्रकार बालिकेने तिच्या आजीला कथन केला. त्यानंतर पिडित बालिकेच्या आजीने त्याला दुकानावर जाऊन जाब विचारला. तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या अशी धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी चान्नी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चान्नी पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

साक्षी, पुरावे आणि दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपी गजानन शिवाजी गवई यास भा.द.वि.376 (2) (आय) नुसार आजीवन कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, 376 (2) (जे) नुसार आजीवन कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम 506 नुसार  दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास व पोक्सो कायदा कलम तीन व चारनुसार आजीवन कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास आणि कलम सात व आठनुसर पाच वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीस सर्व शिक्षा एकत्रीतरित्या भोगायच्या आहेत. एकुण 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड आरोपीकडून वसुल झाल्यास त्यातील अर्धी रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here