रेल्वे प्रवासात चोरी – दाम्पत्याला भरपाई देण्याचे रेल्वेला आदेश

On: February 11, 2022 11:02 AM

जळगाव : रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झालेल्या ऐवजाची नुकसान भरपाई प्रवासी दाम्पत्यास देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. भुसावळ येथील अ‍ॅड. नवाब अहमद हे सपत्नीक प्रवास करत असतांना त्यांच्या ताब्यातील ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणी त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली होती. सुनावणीअंती प्रवासी दांपत्याला 73 हजार 779 रुपयांची नुकसान भरपाई, मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च 5 हजार रुपये असा एकुण 1 लाख 3 हजार 779 रुपये रेल्वे विभागाने देण्याचे आदेश दिले आहेत.

भुसावळ येथील अ‍ॅड. नवाब अहमद आणि त्यांच्या पत्नी परवीन नवाब हे दोघे हबीबगंज धारवाड एक्स्प्रेसने 14 एप्रिल 2019 रोजी भुसावळ ते पुणे प्रवास करत होते. एस 5 या कोचमधे दोघांचे आरक्षण होते. प्रवासादरम्यान पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास परवीन यांनी उशाशी ठेवलेली पर्स चोरी झाली. 25 हजार रुपये रोख, सोन्याची पोत, सोन्याचे पेंडल, दोन घड्याळ, एक मोबाईल तसेच वायफाय रुटरसह काही किरकोळ वस्तूंचा त्या पर्समधे समावेश होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधीत रेल्वे स्थांकावर त्यांनी तक्रार दाखल केली.

रेल्वेच्या आरक्षीत बोगीत अनधिकृत व्यक्ती अथवा चोरट्याने प्रवेश करत प्रवाशांच्या वस्तूची चोरी केल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते हा मुद्दा प्रवासी दाम्पत्याने उचलून धरला. या मुद्द्याच्या आधारे अहमद दांपत्याने ग्राहक न्यायालयात रेल्वे प्रशासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, पुणे, सोलापूर व भुसावळचे मंडल रेल्वे प्रबंधक याशिवाय भारती अ‍ॅक्सा विमा कंपनीला याप्रकरणी प्रतिवादी करण्यात आले. केवळ प्रवाशांचा अपघात व मृत्यूची जबाबदारी विमा कंपनीची असल्याच्या मुद्द्यावरुन विमा कंपनीला यातून वगळण्यात आले. रेल्वे प्रशासनाने प्रवासी व त्यांच्या ताब्यातील वस्तूंची सुरक्षा न घेता त्रुटीयुक्त सेवा दिल्याप्रकरणी त्यांना दोषी मानून तक्रारदार अहमद दांपत्याला नुकसान भरपाईसह इतर खर्च देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाकडून देण्यात आले. तक्रारदार अ‍ॅड. अहमद यांच्यावतीने अ‍ॅड. राजेश उपाध्याय व हेमंत भंगाळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment