जळगाव : रेल्वेच्या सेवेत मराठी तरुणांना सामावून घेण्यासाठी सन 2008 मधे मनसेतर्फे जळगाव शहरात आंदोलन करण्यात आले होते. 21 ऑक्टोबर 2008 रोजी मनसेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या निर्देशनाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात अॅड. जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासिन यांनी सहभाग घेतला होता.
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात लावण्यात आलेल्या डिजिटल बॅनरवर तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर नमुद करुन यावेळी घोषणाबाजी करण्यात आली होती. घटनास्थळी पोलिस पथक आल्यानंतर झालेल्या पळापळीत वाहनांचे नुकसान झाल्याप्रकरणी तसेच आंदोलन केल्याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांची जळगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.