अमरावती : चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन तीला ‘बॅड टच’ करणाऱ्या फळविक्रेत्याविरुध्द विनयभंगसह पोस्को कलमान्वये गुन्हा सिध्द झाला आहे. अमरावती येथील जिल्हा न्यायाधिश (क्रमांक 2) विशाल गायके यांच्या न्यायालयाने दोषी फळविक्रेत्यास पाच वर्ष सश्रम कारावासासह पंधरा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.
राहुल पुरूषोत्तम वाघ (29), रा. बासलापूर, ता. चांदूर रेल्वे असे आरोप शाबीत व शिक्षा सुनावण्यात आलेल्या फळविक्रेत्याचे नाव आहे. 31 जानेवारी 2018 रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. पाणी मागण्याच्या बहाण्याने आरोपी राहुल वाघ पिडीत मुलीच्या घरात गेला. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीला ‘बॅड टच’ केला. याशिवाय त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन देखील केले. या घटनेनंतर आरोपी राहुल वाघ तेथून पळून गेला. आरोपी राहुल पिडीत अल्पवयीन मुलीच्या घराजवळ नेहमी फळांची हातगाडी ठेवत असे. त्यामुळे परिसरातील नागरीकांना तो परिचीत होता.
पिडीतेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राहुल वाघ याच्याविरुध्द विनयभंग, पोस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज इंगळे यांनी सुनावणीच्या वेळी एकुण सात साक्षिदार तपासले. आरोपीविरुद्ध गुन्हा शबीत झाल्याने न्यायालयाने त्याला पाच वर्ष सश्रम कारावासासह पंधरा हजार रुपये द्रव्यदंड, दंडाची संपुर्ण रक्कम पीडितेला नुकसान भरपाईच्या रुपात देण्याचे आदेश दिले आहेत.