नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी विविध याचिका दाखल झाल्या आहेत. दाखल सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात दोन साधूंसह चालक अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. न्यायालयाने महाराष्ट्र शासनाद्वारे दाखल करण्यात आलेला चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सर्व याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सीबीआय आणि एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात चौकशी अहवाल सर्वोच्छ न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी आतापावेतो शंभराहून अधिक जणांना अटक केली होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
१६-१७ एप्रिलच्या रात्री दोघे साधू आपल्या चालकासह गावातून जात होते. त्यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिन जणांचा मृत्यू ओढवला होता. संतप्त जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी तेथे पोलीस हजर होते. पोलिसांचा निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत संबंधित पोलिसांना निलंबित केले होते. सध्या या हत्याकांडाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे.