सांगली : मुलीने सायंकाळी “सातच्या आत घरात” आले पाहिजे अशी तंबी बहुतेक आईबाप आपल्या मुलींना देत असतात. अशी तंबी मुलींना दिल्यामुळे आपल्या मुली सुरक्षीत राहतील असे काही पालकांना वाटते. परंतु हिच तंबी पालकांनी आपल्या मुलांना देखील दिली पाहिजे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या तरी एका भाषणात केले होते. मुलींप्रमाणे मुलांनी देखील सातच्या आत घरात आले तर कुप्रवृत्तीला आळा बसेल हा झाला वैचारिक भाग. परंतु या धकाधकीच्या डिजीटल युगात प्रत्येकाच्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे सातच्या आत घरात हे बोलणे खुप सोपे असले तरी ते प्रत्यक्षात शक्य होत नाही.
आजच्या तरुण पिढीला काळानुरुप बरेच स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचा काही तरुण तरुणी योग्य तो वापर करतात. मात्र काही तरुणाई मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे भरकटली जाते. आपल्या तरुण मुलाने एखाद्या तरुणीवर प्रेम केले अथवा तिला पळवून नेले तरी ते एखाद्यावेळी धकवून घेतले जाते. मात्र आपली मुलगी एखाद्या तरुणासोबत पळून गेली वा त्याच्यासोबत गुपचूप लग्न केले तर समाज काय म्हणेल हा प्रश्न उपस्थित केला जातो.
समाजातील आपल्या सन्माला ठेच लागली म्हणून खूनाचे प्रकार (ऑनर किलींग) देखील घडले आहे. सांगली जिल्हयात घडलेल्या अशाच एका घटनेत बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून चिडलेल्या भावाने काकाच्या मदतीने संबंधीत तरुणाची हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठे पिरान हे गाव वारणा नदीच्या किनारी वसले आहे. येथील बहुतेक लोक सधन आहेत. हे गाव पैलवान मारुती माने यांच्या नावाने ओळखले जाते. कवठे पिरान येथे ओंकार माने आणि निखिल सुतार हे दोन मित्र रहात होते. एकाच गावात रहात असल्यामुळे त्या दोघांची चांगली मैत्री होती. त्यातून दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. दोघांच्या ही कुटुंबाची परिस्थिीती चांगली होती. ओकार हा निखिलच्या घराकडे सारखा येत जात होता. त्यातूनच ओंकारची नजरा नजर निखीलच्या बहिणीसोबत होत असे. ओंकार तिच्या प्रेमात पडला होता.
तिच्याशी जवळीक साधावी म्हणून तो सारखा निखिलला भेटण्याच्या बहाण्याने येत होता. कधी कधी तर तो निखिलच्या गैरहजेरीत देखील येत होता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला होता. निखीलची बहीण कळत नकळत ओकारच्या प्रेमात पडली होती. ते दोघे आता बाहेर भेटत होते. त्याचे प्रेम बहरत फुलत होते. त्या दोघांनी आता लग्न करण्याचा विचार केला होता. आपल्या लग्नाला दोन्ही परिवाराकडून विरोध होणार हे त्यांनी गृहीत धरले होते. त्या दोघांचे जवळपास दोन ते तीन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. त्याच्या प्रेमाची भणक निखिल यास लागण्यास वेळ लागला नाही.
आता निखील त्या दोघांवर नजर ठेवू लागला. त्याने काहीवेळा ओकारला आपल्या घरी येऊ नकोस, माझ्या बहिणीवर नजर ठेवू नकोस. असे बजावले. परंतू ओंकारचे तिच्यावर नितांत प्रेम होते. त्यामुळे त्याने निखिलच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही, उलट तो त्याच्या बहिणीला परस्पर भेटू लागला. निखिलने आपल्या बहिणीला ही बऱ्याच वेळेला समजावले. मात्र ती कुणाचे ऐकत नव्हती. त्यातच निखिलचा स्वभाव हा तापट आणि रागीट होता. त्याने आपल्या घरच्या लोकांशी बोलून बहिणीचे लग्न समाजातील चांगल्या मुलांशी करून देण्याचा विचार मांडला. तसेच त्याने ओंकारला देखील तंबी दिली की आपल्या बहिणीला भेटल्यास परिणाम वाईट होतील.
पण त्या दोघांचे एकमेकावर प्रेम असल्याने पळून जावून लग्न करण्याचा त्यांनी विचार केला होता. वर्षभरापुर्वी त्या दोघांनी पळून जावून लग्न देखील केले. लग्नाला असणारा विरोध लक्षात घेता लग्नानंतर ओकार हा आपल्या पत्नीला घेऊन कवठे पिरान सोडून दुसरीकडे राहण्यास गेला. ओकार हा एका खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला नियमित उत्पन्न मिळत असल्याने तो आपल्या पत्नीसह सुखात रहात होता.
नव्या पत्नीचे लाड तो पुरवत होता. त्याचा संसार सुखात सुरु होता. इकडे आपल्या मित्राने आपल्याच बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याने निखिल चिडलेला होता. आपल्या बहिणीने आपले न ऐकता लग्न केले यासाठी आपला जवळचा मित्र असून त्यानेच तिला फुस लावली असल्याचा त्याचा समज झाला होता. कधी एकदा निखिलला कायमचा धडा शिकवतो असे त्याला झाले होते. त्याच्या डोक्यात राग आणि संताप होता. आपल्या बहिणीने प्रेमविवाह केला याचे त्याला दुःख नव्हते.
परंतु आपल्या जवळच्या मित्रानेच आपल्यासोबत दगाफटका केल्याचा त्याला राग आला होता. ही गोष्ट त्याने आपल्या मित्रांना आणि भावकीतील लोकाना बोलून दाखवली होती. ओकारच्या लग्नाला आता जवळपास वर्ष झाले होते. आता दोन्ही परिवाराचा राग शांत झाला असेल असा ओकारचा समज झाला होता. तो आपल्या पत्नीला घेऊन गेल्या महिन्याभरापुर्वीच कवठेपिरान येथे येवून राहू लागला. त्याच्या घरच्या लोकांनी ही आता त्याच्या प्रेमविवाहाला मुक संमती दिली होती.
ओंकार आता आपल्या संसारात रममान झाला होता. तो आपल्या कामात लक्ष घालत होता. इकडे निखिल मात्र कधी एकदा ओकारला भेटतो आणि त्याला धडा शिकवतो या विचारात होता. त्याच्या मते ओंकार आणि त्याच्या बहिणीने गावात राहु नये असे होते. कारण बहिण मित्रामुळे आपली व आपल्या परिवाराची गावात इज्जत गेली असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे तो ओंकारवर चिडून होता.
या कारणातून त्याने ओंकारसोबत भांडण काढून त्याला दमदाटी देखील केली होती. त्याला गाव सोडून जाण्यास निखीलने सांगून पाहिले होते. तुझ्यामुळे माझी आणि माझ्या घरच्या लोकांची गावात बदनामी झाली आहे असे निखीलने त्याला समजावून सांगितले होते. ओकार ही त्याला आता झाले गेले विसरून जा. आता आपण मित्र नसून मेहूणे पाहूणे झालो आहोत असे सांगून गप्प राहण्यास सांगत होता. दोघे ही परस्परांना बघून घेण्याची भाषा करत होते. यापुर्वी दोघे ही चांगले मित्र होते. पण आता ते एकमेकांचे शत्रू झाले होते.
निखिल आपल्या बाबत टोकाची भुमिका घेणार नाही असे ओकारला वाटत होते. निखिल हा त्याच्यावर डाव धरूनच होता. त्याने आपल्या भावकीतील उदय सुतार याला ओंकारचा गेम करण्याचे बोलला होता. त्यामुळे ते दोघेही आता संधीची वाट पहात होते. शनिवार दि.११जुलै रोजी रात्री उशिरा ११.३० च्या दरम्यान ओकार जेवण करून गावातील जयप्रकाश पाटील याच्या वाड्याजवळ येऊन थांबला होता. रात्री उशिरापर्यंत निखिल आणि उदय आपल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात थांबले होते. आज कोणत्याही परिस्थीतीत ओकारला सोडायचे नाही असे त्यांनी मनाशी ठरवले होते.
त्याचवेळी निखिल आणि उदय सुतार आणि त्याचा एक मित्र सतिश रणदिवे हे तिघेजण एका मोटारसायकलीवरुन ओकार जवळ आले. त्यांनी एकटा थांबलेल्या ओकारला तु आमचे ऐकत नाहीस. गावात राहू नका असे सांगून देखील तुम्ही ऐकत नाही असे म्हणत वाद उकरुन काढला. ओंकार देखील त्यांना जशास तसे उत्तर देवू लागला. याचा निखिल यास राग आला. त्यावेळी त्या तिघांनी ओकारची गंचाडी पकडून त्याला लाथा बुक्कांनी मारायला सुरुवात केली. त्यातच निखिलने आपल्याकडील धारदार चाकूने ओकारच्या पोटात वार केले.
ओंकारच्या पोटातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. तो जागीच कोसळला . तो मदतीसाठी आरडाओरडा करत होता. निखिलने चाकूने केलेला घाव ओकारच्या थेट हृदयापर्यंत गेला होता. त्यावेळी गावातील तरुण त्याच्या मदतीसाठी धावून आले. ते बघुन निखिलसह उदय आणि सतीश हे मोटारसायकलीवरून पळून गेले. त्या तरुणांनी गंभीर जखमी ओकारला उपचारासाठी गाडीत घालून सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु त्याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला. तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.
या घटनेची माहिती सांगली ग्रामीण पोलीसांना मिळाली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली. घटनेनंतर काही तासातच घटनेतील संशयीत निखिल सुतार हा शस्त्रासह सांगली ग्रामीण पोलीसात स्वतःहून हजर झाला. त्याने घडलेली घटना पोलीसांना सांगितली. त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पडलेले होते. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.
या घटनेची फिर्याद मयुर मारूती जल्ली रा.कवठेपिरान याने दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी ओकार माने (वय २२) यांच्या खुनप्रकरणी निखिल सुधाकर सुतार (वय २२) उदय चिल्लय्या सुतार (वय ४२) आणि सतिश रणदिवे (वय २३) याच्या विरोधात भा.दं.वि. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींना सांगली येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला चाकू आणि मोटारसायकल या वस्तू जप्त केल्या. य घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलिस करत आहेत.