जळगाव : खोटा मृत्यू दाखला सादर केल्याचे कारण पुढे करत क्लेम नाकारणा-या बजाज अलायन्झ या विमा कंपनीस 15 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. याप्रकरणी मयत तरुणाच्या आईने क्लेम नाकारणा-या विमा कंपनीविरुद्ध न्याय हक्कासाठी ग्राहक न्यायालयात आपली कैफीयत सादर केली होती. बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीस 15 लाख रुपये, मानसिक त्रासापोटी 15 हजार रुपये आणि अर्ज खर्चासाठी पाच हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगलाबाई गुलाब ठाकुर (54), रा. गेंदालाल मिल असे अर्जदार महिलेचे नाव आहे. मंगलाबाई यांचा मुलगा मुकेश ठाकुर याने 21 जून 2019 रोजी बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीची लाइफ टाईम सीक्युअर विमा पॉलिसी खरेदी केली होती. मुकेशने या पॉलीसीसाठी 5370 रुपये कंपनीला दिले होते. 23 डिसेंबर 2020 रोजी मुकेशचा मृत्यु झाला. या घटनेनंतर क्लेम मिळण्यासाठी मंगलाबाई यांनी विमा कंपनीकडे मागणी केली. मात्र मुकेशचा मृत्यू दाखला खोटा असल्याचे म्हणत कंपनीने क्लेम नाकारला. अखेर मंगलाबाई यांनी ग्राहक न्यायालयात आपले म्हणणे सादर केले. न्यायालयाने त्यांचा क्लेम मान्य करत संबधित कंपनीने मंगलाबाई यांना पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार मंगलाबाई यांच्यावतीने अॅड. विजय महाजन, ऐनपुरकर यांनी न्यायालयीन कामकज पाहिले.