जळगाव : मद्याच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करत विहीरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणी आरोपी शालकास सात वर्ष कारावास तसेच 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अजुन एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायधिश श.ग. ठुबे यांनी सदर निकाल दिला आहे. दिवाकर प्रभाकर जटाळे (40) रा. देऊळगाव गुजरी ता. जामनेर जिल्हा जळगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय लक्ष्मण पाटील असे या घटनेतील मयताचे नाव आहे.
मयत संजय लक्ष्मण पाटील हा आरोपी दिवाकर प्रभाकर जटाळे याच्या बहिणीचा पती होता. दोघे नेहमी दारु पिऊन एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करत असत. घटनेच्या दिवशी 28 डिसेंबर 2019 रोजी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान दोघांनी दारु पिऊन एकमेकांना शिवीगाळ केली. आरोपी दिवाकर जटाळे याने मयत संजय पाटील याला जमीनीवर पाडून त्याच्या छातीवर बसून त्याला विटेने तोंडावर मारहाण केली होती. त्यानंतर संजय पाटील यास विहीरीत फेकून दिले होते. त्यात संजय पाटीलचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला मयताची पत्नी स्वाती संजय पाटील हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा भाऊ दिवाकर जटाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 308/19 भा.द.वि. 302, 510 नुसार दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन तपास अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सर्व साक्षी, पुराव्यांच्या आधारे आरोपी दिवाकर प्रभकर जटाळे रा. देऊळगाव गुजरी ता. जामनेर यास न्या. ठुबे यांनी भा.द.वि. कलम 302 नुसार सात वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. तपासी अंमलदार स.पो.नि. राकेशसिंग परदेशी यांनी तपास पुर्ण केला. तसेच केस वॉच पो.ना. दिनेश मारवडकर यांनी कामकाज पाहिले.