गुणवत्ताहीन याचिका : हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले

legal

नागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केली म्हणून  धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फटकारत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. डॉ. जैन यांना कायद्यातील तरतुदींची माहिती असतांना त्यांनी केवळ नशीब अजमावण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या या प्रयत्नाची प्रशंसा करता येत नाही तसेच त्यांच्या याचिकेमुळे कोर्टाचा वेळ व्यर्थ गेला.

असे असले तरी डॉ. गगन जैन हे महान व्यवसायासोबत जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा खर्च बसवणे टाळत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यांनी यातून धडा घेत भविष्यात कायद्याचा योग्य तो सन्मान करावा, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्या. सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांनी या प्रकरणी निर्णय दिला आहे.

डॉ. जैन यांनी धरमपेठ परिसरातील एका इमारतीच्या तळ मजल्यावर दातांचा दवाखाना सुरु केला होता.  त्या जागेचा उपयोग बदलला गेला. महानगरपालिकेने त्यांना १ फेब्रुवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्या नोटीसला डॉ. गगन जैन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या दातांच्या दवाखान्याला ९ मार्च २०२० रोजी परवानगी दिलेली आहे.

त्यामुळे वादग्रस्त नोटीस अवैध असल्याचे डॉ. जैन यांचे त्यांचे म्हणणे आहे. मनपाने त्यावर उत्तर सादर करत आरोग्य अधिकाऱ्याला उपयोग बदलाची परवानगी देण्याचा अधिकार नाही असे म्हटले. डॉ. जैन यांनी संबंधित जागेचा उपयोग बदलण्याची परवानगी मिळण्यासाठी ९ मार्च रोजी अर्ज सादर केला होआ. तो अर्ज १९ मार्च रोजी फेटाळण्यात आला होता.  उच्च न्यायालयाने सर्व मुद्दे विचारात घेत  याचिका दर्जाहीन ठरवत गुणवत खारीज केली. मनपातर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here