अकोला : पंधरा वर्षाच्या बालिकेवर जन्मदात्याकडून वेळोवेळी अत्याचार व त्यातून ती गर्भवती होण्याची घटना अकोला येथील शिवनी येथे नोव्हेंबर 2019 मधे घडली होती. याप्रकरणी दाखल खटल्याचा निकाल अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. नराधम जन्मदात्याला जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील बालिकेस रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर निंदणीय प्रकार उघडकीस आला होता. डॉक्टरांनी या घटनेची माहिती बाल कल्याण समितीसह पोलिसांना दिली होती. पीडित बालिकेच्या जबाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपरकर यांच्या न्यायालयाने आरोपी पित्यास ३७६ (२) (एफ) (एन) व पॉक्सो कायदा कलम ३-४, ५ (एल) (एन) नुसार दोषी ठरवून आरोपी बापाला आजन्म कारावास, कलम ३७६ (सी) मध्ये १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमाअंतर्गत एकूण १ लाख ८५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमात अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागणार आहे. सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मंगला पांडे आणि किरण खोत यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी अनुराधा महल्ले व प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले. पीडितेच्या जवाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र न्यायालयात पीडित बालिका व तिची आई फितूर झाली. मात्र पिडीतेने अगोदर दिलेला जवाब, वैद्यकीय पुरावा तसेच डीएनए अहवालाचा आधार घेत आरोपीस दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली.