औरंगाबाद : विवाहित बहिणीकडे राहणाऱ्या तेरा वर्षाच्या सालीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करणा-या तरुणास आजन्म कारावास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम.एस. देशपांडे यांनी सदर शिक्षेचा निकाल दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. चार वर्षांनी तो पोलिसांना शरण आला होता. पिडीता फितुर झाल्यानंतर देखील पुराव्याच्या आधारे नराधमास शिक्षा झाली आहे.
शिक्षणाच्या निमित्ताने पिडित अल्पवयीन मुलगी आपल्या विवाहीत बहिणीकडे रहात होती. तीची बहिण कंपनीत कामाला तर मेहुणा भाजीपाला विकण्यासाठी जात असे. एके दिवशी संधी साधून आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. तुझ्या बहिणीला सांगितल्यास तुझे शिक्षण बंद करेन अशी धमकी देत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार सुरुच ठेवला. त्यातून ती गर्भवती राहिली. दरम्यान प्रकरण आपल्या अंगाशी येणार असल्याचे दिसताच संधी साधून त्याने घरातील रोख रक्कम व दागिने घेत पलायन केले. घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पिडितेच्या पोटातील मृत अर्भक काढण्यात आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तत्कालीन तपास अधिकारी ए.पी. भांगे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी सतरा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. मात्र नंतर फिर्यादीच फितुर झाली. मात्र अर्भकाची डीएनए चाचणी तसेच इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. भा.द.वि. कलम 376(2) आणि कलम 376 (2)(एन) नुसार त्याला मरेपर्यंत जन्मठेप तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पीडितेला नुकसान भरपाईपोटी दंडाची रक्कम आणि पोक्सो कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश विधी व सेवा प्राधिकरणाला देण्यात आले.