सांगली : भागीदारीत शक्यतो व्यवसाय करु नये असे जुने जाणकार सांगतात. पती पत्नीत देखील भागीदारीचा व्यवसाय नको असे देखील सांगितले जाते. एकमेकांवर पुर्णपणे विश्वास असेल तरच भागीदारीत व्यवसाय करावा. भागीदारीतील व्यवसाय जोपर्यंत लाभदायक असतो तोवर कुठलाही वाद विवाद अथवा तंटा नसतो. जोपर्यंत व्यवसायात फायदा होत असतो तोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु असते. मात्र भागीदारीच्या व्यवसायात जेव्हा नुकसान होण्यास सुरुवात होते तेव्हा मात्र दोन्ही भागीदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करु लागतात. त्यातून वादाला तोंड फुटते. हे वाद कधी कधी जिवघेणे ठरतात.
सांगली जिल्हयाच्या खानापूर तालुक्यातील माधाळमुळी येथे महादेव आणि विश्वास हे दोघे चुलत भाऊ रहात होते. दोघांच्या घरची परिस्थीती जेमतेम होती. घरची थोडीफार शेतजमीन असली तरी त्यातून उत्पन्न फारसे मिळत नव्हते. त्यामुळे महादेव याने सोन्या चांदीच्या व्यवसायातील गलाई करण्याचे काम शिकून घेतले.
खानापूर विटा परिसरातील अनेक बेरोजगार तरूण या व्यवसायात होते. या भागातील बरेच तरूण या व्यवसायाच्या निमित्याने हैद्राबाद, उत्तरप्रदेश व देशाच्या इतर भागात आहेत. सोने गलाईचे काम शिकण्यासाठी महादेव उत्तरप्रदेशातील सुजानगंज येथे गेला होता. तेथील एका सोन्या चांदीच्या दुकानात तो गलाई करण्याचे काम करत होता. बघता बघता तो गलाई करण्याच्या कामात हुशार झाला. त्याने या कामात प्राविण्य मिळवले.
हा व्यवसाय आपण आता स्वतंत्रपणे करु शकतो अशी त्याला खात्री वाटू लागली. त्यामुळे तो आता गलाई कामाचा व्यवसाय करण्याच्या विचारात होता. परंतू हा व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल त्याच्याजवळ नव्हते. हा व्यवसाय कसा सुरु करता येईल याचा तो विचार करु लागला. हा व्यवसाय करण्याची त्याची मानसिकता झाली होती. या विचारातून तो आपल्या गावाकडे परत आला. व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याने मनातील विचार चुलत भाऊ विश्वास माळी याच्याजवळ बोलून दाखवला. दोघेही नात्याने चुलत भाऊ लागत होते. विश्वासला काही कामधंदा नसल्याने तो देखील कामाच्या विचारात होता. महादेव कडे देखील व्यवसायासाठी लागणारे भांडवल नव्हते. गलाई काम शिकण्यासाठी तो महादेव सोबत सुजानगंज येथे माहिती घेण्यासाठी गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर महादेव प्रमाणेच विश्वासदेखील गलाई काम शिकला.
लवकरच दोघे जण गलाईकाम करण्यासाठी तयार झाले. काही दिवस दोघा भावांनी स्थानिक सराफ दुकानदाराकडे गलाई काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघे भाऊ आपल्या गावाकडे माधाळमुळी येथे परत आले. गावी परत आल्यावर दोघा भावांनी मिळून गलाई व्यवसायासाठी लागणारे भांडवल आणि साहित्य उभे केले. उत्तर प्रदेशातील सुजानगंज येथे दोघे जण पुन्हा गेले. त्याठिकाणी व्यवसायात जम बसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. याठिकाणी महादेवची चांगली ओळख होती. त्या ओळखीच्या बळावर आपला व्यवसायात जम बसेल असे विश्वास यास वाटत होते.
दोघांनी मिळून याठिकाणी भागिदारीत व्यवसाय सुरु केला. दिवसामागून दिवस जात होते. दोघे जण उत्तर प्रदेशातील सुजानगंज येथे गलाईचे काम सोबत करत होते. सुरुवातीला दोघांना या कामातून चांगला नफा मिळत होता. मात्र काही दिवसांनी विश्वासला महादेवच्या कामावर शंका येवू लागली.
महादेव या कामात विश्वास पेक्षा जास्त हुशार होता. तो आपल्यापेक्षा जास्त पैसे घेतो अशी विश्वास यास शंका येवू लागली. या व्यवसायासाठी भांडवल आणि साहित्य आपले असले तरी आपल्या त्या तुलनेत पैसे मिळत नाही असा विश्वास याचा भ्रम झाला. त्यामुळे विश्वास यास सुझानगंज येथे राहणे नकोसे झाले. त्याला गावाकडची ओढ लागली. काही ना काही कुरापती काढून विश्वास हा महादेव सोबत भांडण करु लागला. तु माझ्यापेक्षा जास्त पैसे घेतो असे तो त्याला नेहमी नेहमी म्हणू लागला. ,महादेव त्याला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र विश्वास यास ते काही पटत नव्हते. त्यातून दोघात मतभेद होवू लागले. भागीदारीत सुरू केलेला गलाई व्यवसाय कधी बंद करायचा असे दोघे जण मनातल्या मनात विचार करु लागले. दिवसागणीक उत्पन्नापेक्षा खर्च वाढत होता. त्यातच देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाला.
लॉक डाऊन सुरु झाल्यामुळे नाईलाजास्तव दोघे चुलत भाऊ उत्तर प्रदेशातून पुन्हा आपल्या गावी मे महिन्यत परत आले. गावी आल्यावर दोघात भांडण होवू लागले. माझे गलाईकामासाठी लागलेले भांडवल आणि साहित्य मला परत दे असे विश्वास म्हणू लागला. त्याच्या अशा वागण्याला महादेव पुरता वैतागला होता.
शनिवार दि.१८ जुलै २०२० रोजी रात्री ८.३० च्या सुमारास महादेवच्या घरी विश्वास आला. त्याने महादेवला घरातून बाहेर बोलावले. माझे पैसे आणि गलाई कामातील साहित्य मला परत दे म्हणून तो महादेवसोबत भांडण करु लागला. त्यावर महादेवने त्याला समजावले की आपण दोघांनी गेल्या वर्षापासून गलाईचा धंदा केला. आपल्याला त्यातून आता नफा काहीच राहिलेला नाही. मी तुला कुठून पैसे देवू असा प्रतिप्रश्न महादेवने विश्वासला केला. भागीदारीतील व्यवसाय असल्यामुळे नुकसानीला देखील दोघेजण जबाबदार आहोत हे महादेवचे स्पष्टीकरण विश्वास ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्यामुळे दोघात जोरदार भांडण सुरु झाले.
काहीही करुन विश्वासला महादेवकडून पैसे परत हवे होते. तो महादेवला शिव्यांची लाखोली वाहू लागला. अखेर विश्वासने सोबत आणलेला चाकू खिशातून बाहेर काढला. त्याने महादेवच्या छातीवर व पोटावर चाकूचे सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ महादेव विव्हळत होता. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक जमा झाले. जमाव बघून विश्वास तेथून आपल्या दुचाकीने पळून गेला. महोदव जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघुन त्याची पत्नी राजक्का हिने मोठयाने रडण्यास सुरुवात केली.
जखमी महादेव यास उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पुर्वीच महादेव मयत झालेला होता. त्याला मयत घोषीत करण्यात आले. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी विटा पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पो.उप अधिक्षक अंकुश इंगळे, पो.निरी.रविंद्र शेळके याच्यसह स.पो.नी.प्रदीप झाल्टे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी घटनेची माहिती मयत महोदवची पत्नी राजक्का हिच्याकडून जाणून घेतली. मयत महादेवचा मृतदेह शवविच्छेदनकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला.
मयत महादेव माळी याची पत्नी राजक्का माळी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलिसात विश्वास माळी याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर काही तासातच फरार विश्वास माळी यास लेंगरे ता.खानापुर येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला चाकु हस्तगत केला. या घटनेचा पुढील तपास विटा पोलीस स्टेशनचे स.पो.नी.प्रदीप झाल्टे करत आहेत.