कर्जफेडीसाठी तरुणाचे अजब धाडस गावठी कट्टा रोखून लुटीचा केला प्रयत्न

औरंगाबाद : कर्ज फेडीसाठी थेट घरात घुसून तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून लुटीचा प्रयत्न औरंगाबाद येथे घडला. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र झटापटी दरम्यान हल्लेखोर आरोपीने पेपर स्प्रे मारून झटका देत पळ काढला. मात्र, गल्लीतील तरुणांनी पाठलाग करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

राहुल रावसाहेब आधाने (२९) रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी संजय गाढे हे वाळूज औद्योगिक परिसरातील इंड्युरंस कंपनीत  सरव्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. गाढे कुटुंब आरोपी राहुल यास ओळखत नाही. मात्र, राहुल हा गाढे परिवाराला ओळखत होता.

संजय गाढे यांचा बंगला असल्याचे राहुल अधाने यास माहित होते. आरोपी राहुल अधाने हा रांजणगाव येथील दूध  डेअरीवर कामाला आहे. लॉकडाऊन काळात त्याच्यावर कर्ज झाले आहे. कर्ज झालेल्या पैशासाठी अनेक जण त्याच्याकडे तगादा लावत होते. झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने गाढे परिवाराला लुटण्याचे नियोजन केले. 

काल दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान त्याने संजय गाढे यांचा दरवाजा ठोठावला. यावेळी गाढे यांचा मोठा मुलगा सौरभ याने दरवाजा उघडला. दारातील आरोपीने मला प्रशांत जोशी यांनी पाठवले असल्याचे सांगितले. मला साहेबांना भेटायचे आहे असे तो सौरभ यास म्हणाला. वडील झोपले आहेत असे सौरभ त्याला सांगत असताना अचानक आरोपीने घरात प्रवेश केला.

त्याने गावठी पिस्टल काढून थेट सौरभच्या कपाळावर रोखून धरत एक लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान स्वयंपाक घरातून सौरभची आई बाहेर आली. सौरभच्या आईने प्रसंगावधान राखत त्याला कशासाठी पैसे पाहिजे असा प्रश्न केला. सौरभने आपल्याजवळ केवळ ५ ते १० हजार रुपयेच  असल्याचे त्याला सांगितले.

राहुल अधाने याने आपल्याला ५७ हजार रुपयांची  गरज असल्याचे सांगितले. पैसे दिले नाही तर गावठी कट्टा देणारे  मला मारतील, असे तो म्हणत त्याने हातातील गावठी पिस्टल खाली केले. काही वेळाने राहुल शांत झाल्याचे पाहून वरच्या खोलीत झोपलेल्या साहेबांकडून पैसे घेऊन देतो, असे म्हणत त्याला सौरभने वरच्या मजल्यावर नेले. तेवढ्या वेळात सौरभच्या आईने पती संज्य गाढे यांना प्रकार कथन केला होता.

दरम्यान सौरभचा लहान भाऊ तेथे आला. एकाच वेळी चार जण समोर आल्याचे पाहून राहुलने हातातील पिस्टल सौरभच्या लहान भावावर रोखत पैसे मागण्यास सुरुवात केली. संधी साधत सौरभसह त्याच्या आई व भावाने राहुल अधाने याच्यावर झडप घातली. या झटापटीत राहुलच्या हातातील पिस्टल खाली पडले. आपला जिव वाचवण्यासाठी पैसे मागणारा राहुल पळू लागला. दरम्यान गल्लीतील जमलेल्या तरुणांनी त्याला बाहेर पकडले. पब्लिक मार देत त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here