औरंगाबाद : अल्पवयीन नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या 56 वर्ष वयाच्या चुलत आजोबाला विस वर्ष सक्तमजुरीसह विविध कलमाखाली पंधरा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनवण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आ. चौधरी यांनी सदर निकाल दिला आहे.
चार वर्ष वयाच्या पीडित बालिकेच्या आईने याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी महिलेच्या पतीला मद्यपानाचे व्यसन होते. त्यामुळे ती आपल्या मुलीसोबत माहेरी रहात होती. 28 ऑगस्ट 2016 रोजी फिर्यादी महिलेचा चुलत मामा तिच्याकडे आला होता. त्यावेळी ती स्वयंपाक करत होती. दरम्यान पिडीत बालिकेसोबत फिर्यादी महिलेचा चुलत मामा लैंगिक शोषण करतांना तिला दिसला. त्याला जाब विचारल्यानंतर तो तेथून पळून गेला. या घटनेप्रकरणी एमआयडिसी सिडको पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी एकुण सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले. न्यायालयीन कामकाजात पीडितेची आजी आणि डॉक्टरांची साक्ष मोलाची ठरली. न्यायालयाने नराधम आजोबाला दोषी ठरवत पोक्सोच्या कलम 6 नुसार विस वर्ष सक्तमजुरीची सजा सुनावली आहे.




