पोलिस अधिका-यासोबत गुन्हेगाराने केली झटापट- पिस्तुलातून सुटली गोळी, आरोपी पकडले पटापट!!

जालना : फरार आरोपीला ताब्यात घेत असतांना झालेल्या झटापटीत सहायक पोलिस निरिक्षकाच्या ताब्यातील पिस्तुलातून गोळी सुटली, मात्र सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. जालना जिल्ह्याच्या बदनापुर तालुक्यातील दाभाडी येथे घडलेल्या या घटनेतील वाळू व्यवसायाशी संबंधीत आरोपीसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. दरम्यान या घटनेने जालना जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

गेल्या काही महिन्यापासून दाभाडी परिसरात वाळू व्यावसायीकांनी नदीपात्राला पोखरुन काढले आहे. वाळूने भरलेले वाहन पकडत असतांना ते वाहन संतोष दानवे या आरोपीने पळवून नेले होते. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संतोष दानवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेपासून संतोष दानवे फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते.

20 मार्च रोजी फरार संतोष दानवे दाभाडी परिसरात येत असल्याचे स.पो.नि. एस. डी. रामोड यांना समजले होते. त्याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षक शिवाजी बनटेवाड यांना माहिती दिली होती. दानवे यास पकडण्याकामी सापळा लावण्यात आला. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच हायवा वाहन घेऊन येत असलेल्या संतोष दानवे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग पोलिस पथकाने सुरु केला. दरम्यान संतोष दानवे याचे काही साथीदार त्याच्या मदतीला धावून आले. स.पो.नि. रामोड यांनी दानवे यास पकडण्याचा प्रयत्न केला असतांना  दानवे याच्या साथीदारांनी प्रतिकार सुरु केला. या झटापटीत स.पो.नि.रामोड यांना खाली पाडून त्यांच्या ताब्यातील पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी सुरु केला. दरम्यान पिस्तुलातील गोळी सुटली. यात कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान स.पो.नि. रामोड यांच्या मदतीला होमगार्ड अमोल रगडे, चंद्रकांत लोखंडे, अशोक नागवे, रामेश्वर टेकाळे आदी सरसावले. सर्व आरोपींना ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. या थरारक घटनेमुळे खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here