हिंगोली : चहा तयार करण्यास उशीर झाला या कारणावरुन हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे रवींद्र नारायण टाले याने पत्नीला मारहाण करत पेटवून दिले होते. खुनाच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी 22 मार्च रोजी हा निकाल दिला आहे.
हिंगोली तालुक्यातील काळेगाव येथील राधाबाई रवींद्र टाले (25) या विवाहितेस तिचा पती रवींद्र नारायण टाले याने 28 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाजता तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान मृत्युशी झुंज देत 21 सप्टेंबर 2016 रोजी राधाबाईचे निधन झाले होते. हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उप -निरीक्षक पी.आर. वांद्रे यांनी याप्रकरणी हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. एस. डी. कुटे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. त्यांना अॅड. एन. एस. मुटकुळे, अॅड. सविता देशमुख यांनी मदत केली.