जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकाने दोघा चंदन तस्कराने अटक केली आहे. वजीर खान मेहमुद खान (32) आणि असलम चांद खान दुलोद (23) दोन्ही रा. कुंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद अशी चंदन तस्करांची नावे आहेत. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
23 मार्च रोजी वाघळी शिवारातील संजय बळीराम भंगाळे हे कसत असलेल्या शेतानजीकच्या नाल्यात चंदनाच्या झाडांची तोडून चोरी होत असल्याची माहिती पो.नि. संजय ठेंगे यांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला रवाना करुन कारवाईच्या सुचना दिल्या. दोघा संशयीत चंदन चोरट्यांच्या ताब्यातील मोटार सायकलच्या सिटखाली कु-हाड, दोन हाताने फिरवायच्या ड्रील मशीन, ड्रील मशीनला लावायची लाकडी मूठ, एक कुदळी व छोटी कानस असे साहित्य आढळले. त्यामुळ ते दोघे चंदनचोर असल्याची पोलिस पथकाची पक्की खात्री झाली. संजय बळीराम भंगाळे, रा. वाघळी, ता. चाळीसगांव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरनं. 158/22 भा.द.वि. 379, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्याकडून चोरलेल्या चंदनापैकी सुमारे बारा हजार रुपये किमतीचा पाच किलो चंदनाच्या लाकडाचा तुकडा हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील दोघांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर गुन्ह्यात कन्नड तालुक्यातील आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ दत्तात्रय धोंडू महाजन, पोना जयंत लक्ष्मण सपकाळे, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना जयंत सपकाळे पुढील तपास करत आहेत.
