जालना : पोलिस कर्मचा-यास दगड मारुन जखमी तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे. परमेश्वर दिगंबर पोले (28) रा. पेवा, ता. मंठा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस कर्मचारी विलास कातकाडे हे 6 एप्रिल 2020 रोजी रात्री साडेसात वाजता घटनास्थळ पंचनामा आटोपून परत येत असतांना वाटेत नळडोह गावानजीक आरोपी परमेश्वर पोले याने त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच डोक्यात दगड मारुन जखमी केले होते.
या घटनेप्रकरणी मंठा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने एकुण चार साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. फिर्यादी पोलिस कर्मचारी विलास कातकाडे, साक्षीदार दिलीप गोडबोले, विजय तांगडे, तपास अधिकारी विजय जाधव यांनी न्यायालयात दिलेल्या साक्षी, पुरावे तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेत जिल्हा व सत्र न्या. ए.एल. टिकले यांनी आरोपी परमेश्वर पोले यास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिन वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अजून तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. दीपक कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.