तहसीलदारांना झाली लाचेची लागण!!——— एसीबीने केली नाही त्यांची पाठराखण

जळगाव : वयाच्या तिशीत एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळालेल्या तहसीलदारपदाचा गैरवापर करण्याची कुबुद्धी बोदवडचे तरुण तहसीलदार योगेश टोंपे यांना नडल्याचे आज दिसून आले. सरकारी नोकरीच्या सुरुवातीच्या अर्थात ऐन उमेदीच्या कालावधीत अधिकाधिक पैसे मिळवण्याचा जोश त्यांच्या अंगाशी आला. खाते प्रमुखच लाचखोर म्हटल्यानंतर त्यांचा चालक, तलाठी आणि जवळीक साधलेला खासगी पंटर असे चौघे जण एसीबीच्या कारवाईत अडकले. एसीबीने महसुल विभागाशी संबंधीत बड्या व्यक्तीवर कारवाईचे दंड थोपटल्याने महसुल विभागाची प्रतिमा निश्चितच डागाळली आहे. रस्त्यावरील एखादा पोलिस कर्मचारी कुणाकडून लाच घेत असेल तर चाळीस लोकांची नजर तिकडे असते. मात्र एसीच्या थंड हवेत बसून चार भिंतीच्या आड मोठ्या रकमेची लाचखोरी करणा-या टोंपे यांच्यासारख्या महसुली अधिका-यांकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही हे देखील तेवढेच खरे आहे. या घटनेतून वाळूचा प्रश्न देखील पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून आले आहे.

योगेश्वर नागनाथराव टोंपे (32) तहसिलदार बोदवड जि.जळगाव, अनिल रावजी पाटील (51) – तहसिलदार यांच्या शासकीय वाहनावरील चालक, मंगेश वासुदेव पारिसे (31) तलाठी बोदवड आणि खासगी पंटर शरद समाधान जगताप (25) अशी चौघा लाचखोरांची नावे आहेत.

या घटनेतील तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. 26 मार्च 2022 रोजी तहसीलदार टोंपे यांनी तक्रारदाराचे वाळूचे वाहन सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान अडवले होते. त्यावेळी लाचखोरीला मुक संमती देणारे तहसीलदार योगेश्वर टोंपे शासकीय वाहनात ऐटीत बसले होते. त्यांच्यावतीने तिघांकडून लाचखोरीची बोलणी सुरु होती. त्यांच्या शासकीय वाहनावरील चालक अनिल पाटील व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर शरद जगताप यांनी नियमीत हप्त्याचे 23,000/- रुपये जागेवरच घेतले. त्यानंतर सदर गाडी सोडण्यासाठी 10,000/-रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली.

वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी बोदवड तलाठी मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतुक करु देण्याकामी लाचेच्या रुपात तिन हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. चरख्यात पिळल्या जाणा-या उसाच्या रसाप्रमाणे आपला सर्व आर्थिक अर्क आणि रस काढला जात असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. आता पुढील पैसे देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीचे कार्यालय गाठून आपली लेखी कैफीयत मांडली.

26 मार्चच्या घटनेत अडवलेले वाळूचे वाहन सोडवण्याच्या मोबदल्यात तहसीलदार आणि त्यांच्या वाहनावरील सरकारी वाहन चालक यांनी सुरुवातीला मागीतलेली दहा हजाराची रक्कम तडजोडीअंती घासाघीस करत उपकार केल्याच्या भाषेत पाच हजार रुपयावर खाली आल्याचे पडताळणीत आढळून आले. तसेच वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या नादात बोदवड तलाठी मंगेश पारिसे यांनी सदरचे अडवलेले वाहन भविष्यात बोदवड हदीत चालु ठेवण्याच्या मोबदल्यात तिन हजार रुपयांची मागणी रेटून नेली. ते देखील एसीबीच्या पडताळणीत आढळून आले. तहसीलदार व त्यांचा चालक अशा दोघांनी मिळून पाच हजाराची तसेच तलाठी यांनी तिन हजाराची आणि या तिघांना हवी असलेली एकुण आठ हजाराची रक्कम स्विकारणा-या खासगी पंटरला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. असा हा आठ हजाराचा प्रवास लाचेच्या सापळ्यात थांबला.

एसीबीचे डिवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेत कारवाईला मुर्त स्वरुप दिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here