अमरावती : विदेशात असल्यामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकत नसलेल्या पत्नीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून साक्ष दिल्यानंतर कौटूंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. विवाहबंधनात अडकल्यानंतर आपसात पटत नसल्यामुळे काही वर्षातच समन्वयातून उच्चशिक्षित दाम्पत्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नीला विदेशात नोकरीची संधी मिळाली. घटस्फोटाच्या अर्जावर साक्ष देण्यासाठी भारतात येणे शक्य नसल्यामुळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पत्नीने साक्ष दिली. त्यानंतर न्यायालयाने दाम्पत्याचा घटस्फोट मान्य केला.
दाम्पत्याची न्यायालयीन बाजू मांडणारे अॅड. पराग ठाकरे यांनी पत्नीची साक्ष व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेण्याची न्यायालयाला विनंती केली. याशिवाय भारतीय दूतावासात सत्यापित केलेले शपथपत्र न्यायालयासमक्ष सादर करण्यात आले. न्यायालयाने विनंती मान्य केल्यानंतर घटस्फोटासाठी पत्नीची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर प्रकरण निकाली निघाले.