अहमदनगर : सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघा आरोपींना विस वर्ष सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. संगिता ढगे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
अमोल ताराचंद उर्फ खादवड्या पवार (42), रा. बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत, रज्जाक चिवल्या काळे (42), रा. येसवडी, ता. कर्जत, सागर गोट्या उर्फ बंडू काळे (29), रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, चक्क्या उर्फ लंकेश काळे (32), रा. बैलबाजार, राशीन अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. 5 मार्च 2020 रोजी सदर घटना घडली होती. पीडिता कर्जतला येण्यासाठी बेलवंडी गावाच्या दिशेने जात असतांना आरोपींनी तिच्यावर डाळिंबाच्या बागेत सामुहीक अत्याचार केला होता. कर्जत पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक एस. पी. माने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकुण नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. पीडिता, घटनास्थळ साक्षीदार, तपासी अंमलदार माने, वैद्यकिय अधिका-यांच्या साक्षी या खटल्याच्या कामकाजात महत्वपुर्ण ठरल्या. सरकारी वकील अॅड. ढगे यांनी यांनी केलेला युक्तिवाद, साक्षी पुरावे आदींचा विचार करुन न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. कलम 376(ड) नुसार आरोपीतांना प्रत्येकी विस वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महिने साधी कैद, कलम 394 नुसार प्रत्येकी दहा वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतून पिडीतेस नुकसान भरपाईच्या रुपात विस हजार रुपये देण्याचे आदेश देखील देण्यात आले. पैरवी अधिकारी मपोकॉ खामकर, पोना गणेश ठोंबरे, दरेकर व मपोना सुजाता गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.