अमरावती : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपी पित्याला अमरावती येथील विशेष अतिरिक्त न्यायाधीश एस. जे. काळे यांच्या न्यायालयाने विस वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 26 जून 2020 रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी वरुड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या वेळी सहा महिन्यांची पिडीत गर्भवती मुलगी ही चौदा वर्षाची होती.
पिडीतेच्या शेजारी राहणा-या महिलेने याप्रकरणी वरुड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पिडीतेची विचारपुस केली असता तिचा जन्मदाता बापच आरोपी असल्याचे तिने कथन केले. पिडीतेने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या जन्मदात्या बापासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कालावधीत पिडीतेने बाळाला जन्म दिला. बाळाचे डीएनए तिच्या जन्मदात्या पित्यासोबत जुळून आले. या खटल्यात एकुण तेरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील दोन फितुर झाले. साक्षीदारांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत विशेष अतिरिक्त न्या. एस. जे. काळे यांच्या न्यायालयाने आरोपी पित्याला विस वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस निरीक्षक सारिका बागडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.शशीकिरण पलोड यांनी युक्तीवाद केला. राजेंद्र बायस्कर व अरुण हटवार यांनी पैरवी अधिकारी म्हणूक कामकाज पाहिले.