लकडावालाकडून राणांनी घेतले 80 लाखांचे कर्ज— संजय राऊतांनी निभावला एक्स्पोजर गेमचा फर्ज!

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी बघता प्रत्येक जण आपापल्या परिने एक्सपोजर गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या जमान्यात धूर्त आणि संधीसाधू लोक योग्य वेळ आल्यावर आपला स्वार्थ साधतात. कोण – कोण कुठ –  कुठ हाथ की सफाई दाखवतो त्यावर नजर ठेवतात. संधी मिळताच तेच करतात. हे सारं आठवण्याचे कारण लकडावाला. हा लकडावाला म्हणे अंडरवर्ल्ड डॉन कंपनीचा “गुर्गा”. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाच्या प्रकरणात गाजत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या लकडावालाकडून 80 लाखाचं कर्ज घेतल्याचे प्रकरण संजय राऊत यांनी उघड केलंय. या राणांच्या निवडणूकपूर्व प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख असल्याचे राऊत यांनी जाहीर केले.  त्यामुळे काहींचं पित्त खवळले.  शिवसेना आणि संजय राऊत विरोधक भाजपा समर्थकांनी अंडरवर्ल्ड डॉन डी कंपनीचा  गुर्गा म्हणून वावरलेल्या लकडावालाची अनेक राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधाचा शोध निबंध प्रकाशझोतात आणला. राकॉचे मंत्री नवाब मलिक यांनी अशाच मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तींशी संबंध असलेल्यांकडून  जमीन विकत घेतल्याचा नगारा बडवला. एवढेच नव्हे तर हे “टेंडर फंडींग” प्रकरण असल्याचही सांगितलं जात आहे.

देशाच्या दुश्मनांशी आमचा लढा आणि विरोधीपक्षीयांची त्यांच्याशी मैत्री अशा पद्धतीने प्रकरण पेश केली जाताय. “आपण” आणि “ते” अशीही विभागणी. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हाच फॉर्म्युला वापरल्याच म्हणतात. वास्तविक भारत देशाचे दुश्मन अतिरेकी – आतंकवादी यांचं समर्थन कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही हेही खरच आहे.  पण सोयीप्रमाणे नाण्याची एकच बाजू वाजवून त्याचा खरेपणा सिद्ध होऊ शकतो का? सामाजिक – सार्वजनिक – राजकीय जीवनात वावरणाऱ्या नेत्यांच्या अवतीभवती नेहमीच लोकांचा गराडा असतो. नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा फार्मुला म्हणून अनेक फंडे वापरले जातात. एखाद्या मंत्र्याच्या मुला-मुलींच्या लग्नात मंडपापासून भोजनावळी पर्यंत बडदास्त ठेवण्याची जबाबदारी काही कंत्राटदारांनी निभावलेली आहे. तशा बातम्यांची रसभरीत वर्णने कमी नाहीत. “आपण या राज्यातील सर्व समाज घटकांसोबत आहोत” हे राजकीय क्षेत्रातील लोकांना दाखवावेच लागते. त्यासाठी लोकाभिमुख प्रतिमा आवश्यक ठरते. नेत्यांच्या महाराष्ट्रभरच्या दौऱ्यात अनेक शहरात अनेक प्रकारची तरुण मंडळी नेत्यांच्या आजुबाजूला राहण्याचा प्रयत्न करते, नेत्यांचे स्वागत करते. हे सर्वच जण शुद्ध चारित्र्याचा दाखला खिशात घेऊन नेत्यांपर्यंत पोहोचल्याचे कोणी नेता छातीठोक पणे सांगू शकणार नाही.

yusuf lakadawala

काही वर्षापूर्वी भाजप राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत असेच एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. (विचारा हवं तर नाथा भाऊंना) प्रत्येक जिल्ह्यात प्रस्थापित राजकारण्यांसोबत  राहून तर कधी दुसऱ्या गटासोबत जाऊन नव्या पिढीच्या तरुणांना त्यांच करिअर घडवायचे असते. त्यासाठी अनेक फंडे वापरावे लागतात. त्यापैकीच एक असावा लकडावाला फंडा. आता हा लकडावाला हयात नसल्याचे म्हणतात. पण त्याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखाचं कर्ज घेतल्याचे म्हणतात. म्हणजे आता परत करण्याचा प्रश्नच संपला. राजकारणी लोक मुळातच खूप हुशार. पक्षनिधी – देणग्या घेतल्या तर हिशेबात दाखवण्याची कटकट.  मोका साधून तिकडच्या  पक्षातला पुढारी इकडे घेऊन मिळालेली कोट्यावधीची कथित पक्षनिधीची रक्कम फस्त करणारेही आहेतच म्हणतात. राजकीय नेते विसरले तरी वेळी-अवेळी त्यांच्याकडे धाव घेऊन पक्षनिधी देऊन स्वतःचा मतलब साधणा-यांची कमी नाही. नेत्यांना राजकीय पक्षांना काही लाख कोटी कसे द्यायचे? मदत तर घ्यायची परंतु ती लाच म्हणून दिली असे कोणी ओरडू नये याची खबरदारी घेतली जाते.  संबंधितांच्या कंपनीचे शेकडो-हजारो शेअर्स खरेदी करुन व्यवहार केला जातो. त्यांच्याशी संबंधित कंपनीस लाखो-करोडोचे कर्ज दिले जाते. कर्ज देणारा देतो, घेणारा घेतो. देणारा ती रक्कम परत मागणारच नाही याची खात्री असतेच. दोघे एकमेकांची सोय बघतात. आज एजाज लकडावाला गाजतोय. काही वर्षापूर्वी कुण्या इकबाल मिर्चीकडून भाजपने म्हणे कोट्यावधीची देणगी स्विकारल्याचा आरोप झाला होता. तेव्हा ही वीस कोटीची देणगी असा आरोप गाजला. अर्थात आरोप हे फेटाळण्यासाठीच असतात. ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडेच लोक त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी धाव घेतात. गिफ्ट देतात. मधुर संबंध ठेवू इच्छितात. पॉवरफूल राजकारण्यांचे सारेच व्यवहार पॉवरफूल म्हटले जातात. हवाला रॅकेटर्स ही आजच्या काळाची गरज म्हटली जाते.

महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी धर्मभास्कर प्रकरण  गाजले. धुळे जिल्हा परिषदेत केवळ कारकून कम कॅशियर पदावरील भास्कर वाघ नामक इसम लाखो करोडो रुपये मुक्तहस्ते वाटत सुटला होता. त्याच्या लाभार्थ्यांमध्ये महसूल प्रशासन, राजकारण्यांचा प्रचंड भरणा होता. यंत्रणेने त्याला बरीच वर्ष सांभाळले. विरोध करणारे, बिंग फोडू पाहणाऱ्यांवर हल्ले झाले. नंतर बिंग फुटलेच. धर्मभास्कर कारागृहाचे गज मोजतोय. अशाच एका माजी मंत्र्यासाठी  “आपकी अदालत” च्या रजत शर्मा यांनी सेवा वापरल्याचे सांगतात. सध्या एक्सपोजर गेमचे दिवस आहेत. हवेतील उष्णता वाढतेय, सावध राहणे हेच सर्वोत्तम.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here