जळगाव : उच्च न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून होण्याकामी जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या पाठपुराव्याची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाला योग्य त्या कार्यवाहीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. या संदर्भात राज्यपालांचे मुख्य सचिव संतोष कुमार यांचे एक पत्र दीपककुमार गुप्ता यांना देखीलप्राप्त झाले आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फेब्रुवारी महिन्यात जळगाव येथे आले होते. त्यावेळी गुप्ता यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले होते. उच्च न्यायालयीन कामकाजाची (उदा. न्याय निर्णय, डिक्री ऑर्डर ई.) भाषा मराठी होण्यासंदर्भात निवेदनात विनंती करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेण्यात आली असून त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाला पुढील कारवाईकामी पत्र देण्यात आले आहे. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी 28 मार्च रोजी गुप्ता यांना देखील यासंदर्भातील एक पत्र पाठवले होते. ते गुप्ता यांना मिळाले आहे.