ट्रक चोरी – विक्री व हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

जळगाव : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ट्रक चोरी करुन त्यावरील क्लिनरची हत्या व त्या ट्रकची जळगाव शहरात विक्री केल्या प्रकरणी एका संशयीत आरोपीस जळगाव शहरातून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात दाखल गुन्ह्यातील आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने जळगाव शहरातून अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निजामखान मासुमखान मुलतानी (42) रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निजाम खान याच्यावर यापुर्वी एकुण पाच गुन्हे दाखल आहेत.

भोपाळ येथील वाहतुक व्यवसाय करणारे मोहंमद शफीक मोहंमद (35) यांच्या मालकीचा दहा चाकी ट्रक होता. तो ट्रक त्यांनी भोपाळ येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर उभा केला होता. सदर ट्रक 12 जुलै 2016 ची रात्र ते 13 जुलै 2016 च्या पहाटेच्या दरम्यान चोरी झाला होता. तसेच या ट्रकवरील क्लिनर गुलाबसिंग हा देखील गायब झाला होता. अज्ञात इसमाविरुद्ध ट्रक चोरीचा तसेच क्लिनर गुलाबसिंग गायब झाल्याप्रकरणी मिसींगचा गुन्हा निशातपुरा पोलिस स्टेशन भोपाळ येथे दाखल करण्यात आला होता.  

या गुन्ह्याच्या तपासाअंती भोपाळ पोलीसांनी आरोपी लखनसिंग उर्फ नथनसिंग विश्वकर्मा, रा. ग्रामपट्टन, समशाबाद जि. विधीसा, मध्यप्रदेश, सिराजखान अस्मतखान रा. पालकमंदीर हायस्कुल, शहाबाजार, औरंगाबाद, संतोष सोनी उर्फ नितेश ओंकार सोनी, रा. सनावत, भोपाल, मध्यप्रदेश या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी लखनसिंग याने क्लिनर गुलाबसिंग याची हत्या करुन मृतदेह ग्वालुघाट, बलवाडा, खरगोन येथील जंगलात फेकून दिल्याचे कबुल केले आहे. या गुन्ह्याप्रकरणी भा.द.वि. 364, 302, 411, 120 ब, 201 हे वाढीव कलम लावण्यात आले होते.

सदर गुन्हयातील चोरी करण्यात आलेला ट्रक हा सिराजखान अस्मतखान याच्या मध्यस्तीने यासीनखान मासुमखान मुलतानी, अरबाज यासीनखान मुलतानी, निजामखान मासुमखान मुलतानी, रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव तसेच चालक अफजल उर्फ गुड्डू रा. जळगाव अशा चौघांना विक्री करण्यात आला होता. 16 डिसेंबर 2020 रोजी या गुन्ह्यातील यासीनखान मासुमखान मुलतानी यास भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली होती.  अरबाज यासीनखान मुलतानी, निजामखान मासुमखान मुलतानी व चालक अफजल उर्फ गुड्डू रा. जळगाव हे दोघे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

या फरार आरोपींपैकी निजामखान मासुमखान मुलतानी (42) रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, जळगाव हा घरी असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, किशोर पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे आदींनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याला पुढील तपासकामी भोपाळ मध्य प्रदेश येथील निशातपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक बनवारी लाल, स.फौ. जयवंतसिंग चंदेल, पो.कॉ. मोहित राठोड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निजाम याच्याविरुद्ध यापुर्वी पाच गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here