मुंबई : तडीपारीची नोटीस मिळालेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी “मै हू ना” अशा तीन शब्दात निरोप पाठवला आहे. अविनाश जाधव यांना कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. त्यानंतर मनसेचे विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनबाहेर हजेरी लावली होती. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी हद्दपारीची नोटीस बजावली आहे.
काही दिवसांपासून अविनाश जाधव अनेक प्रश्नांवर आंदोलन करत आहेत.त्यासोबत शासनावर टीका देखील करत आहेत. ठाणे मनपाच्या कोविड रुग्णालयात नर्सचे काम करणाऱ्या मुलींना कामावरून कमी केल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे मनपासमोर आंदोलन सुरु होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज न्यायालय काय निर्णय देते याकडे मनसेचे लक्ष लागून आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर निघतांना बाळा नांदगावकरांना राज ठाकरेंनी जाधव यांच्यासाठी एक निरोप पाठवला. “अविनाश मै हू ना” असा शॉर्ट बट स्वीट तो निरोप होता. नोटीस आली म्हणून आपण थांबणार नसून लोकांसाठी शासनाकडे भांडणार असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.