अमरावती : मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुलाला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 22 जुलै 2020 रोजी सदर घटना फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन हद्दीत पोहराबंदी या गावी घडली होती. राजू मारोतराव पाचबुध्दे (42) रा. पोहराबंदी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
22 जुलै 2020 रोजी सायंकाळी पार्वती मारोतराव पाचबुध्दे (65) व त्यांचे पती मारोतराव चंपकराव पाचबुध्दे हे दाम्पत्य घराबाहेर बसले होते. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत त्यांचा मुलगा राजू तेथे आला. आल्यानंतर त्याने अमरावती येथे रहात असलेली पत्नी आणि मुले आणून द्या असे म्हणत शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने वडील मारोतराव यांच्यावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी राजु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात नंतर खूनाचे कलम वाढवण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयात एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. राजू पाचबुद्धे यास आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पंकज रामेश्वर इंगळे यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून देवराव डकरे व अरुण हटवार यांनी मदत केली.