खामगाव : महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस बारा वर्षांसाठी सश्रम कारावासाची सजा सुनावण्यात आली आहे. जळगाव जामोद येथील या घटनेचा निकाल खामगाव येथील जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दिला आहे. जळगाव जामोद येथील न्हावीपुरा परिसरात अविवाहित दिव्यांग महिला तिच्या वडिलांसोबत राहते. बकरीचा चारा आणण्यासाठी ती गेली असता आरोपी निलेश जाधव (25) याने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला होता.
या प्रकरणी 28 ऑगस्ट 2017 रोजी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या जवाबानुसार 13 सप्टेंबर 2017 रोजी आरोपी नीलेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आल्यापासून तो कारागृहातच आहे. दरम्यान पिडीतेने एका मुलीला जन्म दिला. दोघांना बुलडाणा बालगृहात ठेवण्यात आले. बाळ, त्याची आई व आरोपीची डीएनए चाचणी घेतली असता आरोपी निलेश जाधव याने ते कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी एकुण 12 साक्षीदारांची तपासणी झाली. या घटनेचा साक्षीदार मंगेश राऊत फितुर झाला. न्यायालयाने आरोपी नीलेश जाधव यास बारा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.