मुंबई : हद्दपारीची नोटीस बजावण्यात आलेले मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. 3 ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आलेल्या कोठडी नंतर अविनाश जाधव यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मनसेला एक प्रकारे धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अविनाश जाधव यांचे सरकारवर टीका करण्याचे काम सुरु आहे. ठाणे मनपाच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना कामावरुन काढल्यामुळे मनसेकडून शुक्रवारी ठाणे मनपासमोर आंदोलन सुरु होतं. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसेचे नेते नितीन सरदेसाई आज न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान हजर होते. नितीन सरदेसाई यांनी न्यायालयाच्या सुनावणीबाबत म्हटले की अविनाश जाधव यांच्यावर कलम ३५३ लावण्यात आले आहे. त्यामुळे ३५३ या प्रकारातील गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होते. त्यामुळे याप्रकरणी सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अविनाश जाधव यांना 6 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना तळोजा तुरुंगात रवाना करण्यात आले आहे. अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशाप्रमाणे आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांच्या जामीनाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.