महिला ‘एपीआय’चा गळा दाबून पोलिस स्टेशनमधे मारहाण

अमरावती : एका तरुणाला मारहाण करत त्याच्याकडे असलेली रक्कम लुटल्याच्या चौकशी व तपासकामी राजापेठ पोलिसांनी एका व्यक्तीला व महिलेला पोलिस स्टेशनला बोलावले होते. चौकशीअंती अटकेची कारवाई सुरु असतांना दोन महिला व दोन पुरुषांनी एपीआय प्रियंका कोठावार यांच्या अंगावर धाव घेत त्यांना मारहाण केली. दरम्यान दोघांपैकी एका महिलेने त्यांचा गळा आवळला. राजापेठ पोलिस स्टेशनच्या हॉलमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून दोघांना अटक केली आहे.

बाबू ऊर्फ योगेश चुडे (50), रा. विजयनगर, अमरावती याच्यासह अन्य एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात तेजस चुडे व अन्य एक महिला अशांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या चौकशीअंती तुम्हाला अटक करायची आहे, असे स.पो.नि. कोठावार यांनी सांगताच बाबू चुडेसोबत असलेल्या दोघांपैकी एका महिलेने त्यांचा गळा दाबला होता. दुसरी महिला व बाबू चुडे यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेत सपोनि कोठावार यांच्या गळ्यावर दुखापत झाली. उपस्थित इतर पोलिसांनी स.पो.नि. कोठावार यांची सुटका केली.

तुला बाहेर कापून टाकतो व खून करतो अशी बाबू चुडे व त्याच्यासोबतच असलेल्या तरुणाने स.पो.नि. प्रियंका कोठावार यांना धमकी दिली. त्यानंतर बाबू चुडेने त्याच ठिकाणी दुपट्ट्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करुन तुला फसवतो, अशी धमकी दिल्याचे कोठावार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बाबू चुडे, तेजस चुडे व दोन महिला यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू चुडे व एका महिलेला लुटमार प्रकरणातील गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here