बीड : पतीशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या तिन वर्षाच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह नदीत फेकणाऱ्या महिलेस बीड सत्र न्यायालयाचे प्रमुख सत्र न्या. हेमंत महाजन यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सहायक सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. शारदा श्रीराम शिंदे (रा. शाहूनगर, बीड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
शारदा शिंदे या महिलेचा पती श्रीराम शिंदे याचे शहरातील अंकुशनगर भागातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरुन शारदा आणि त्या महिलेत नेहमी वाद होत असत. सन 2019 मध्ये शारदाने एके दिवशी त्या महिलेच्या तिन वर्षाच्या सार्थक नावाच्या मुलाला घरातून उचलून आणून त्याची हत्या केली. हत्येनंतर बालकाचा मृतदेह कर्परा नदीत फेकून देण्यात आला होता. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात एकुण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. दोष सिद्ध झाल्यानंतर आरोपी महिला शारदा शिंदे हिस दहा वर्षसाठी सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.