जळगाव : शेतीला नैसर्गिक आपत्तींसह पडलेल्या दरांमुळे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, मात्र अथक परिश्रम, सुयोग्य तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक असलेली बाजार पेठेचा अचूक वेध घेणे यातून शेतीचा मार्ग खडतर असला तरी समृद्धशाली बनविता येऊ शकते असा सूर शेतकर्यांच्या संवादात उमटला. उच्च तंत्रज्ञानामुळे न्हावी येथील व्यक्ति टेन्याचा टेनुशेठ झाल्याचा थक्क करणारा प्रवास फालीचा विद्यार्थ्यांनी अनुभवला. फालीच्या आठव्या संमेलनाच्या दुसऱ्या सत्राचा पहिल्या दिवशी शेतकर्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये न्हावी येथील टेनू बोरोले, सौ. नीलिमा बोरोले, कुंभारखेड्यातील प्रशांत राणे, उच्चविद्याविभुषित शेतकरी प्रशांत पाटील, राजेंद्र पाटील यांचा सहभाग होता.
दि. ५ जून रोजी फालीच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनचे नाविण्यपूर्ण सादरीकरण व बिझनेस मॉडेल सादरीकरण होईल. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व गोदरेज अॅग्रोवेट स्पेशल प्रोजेक्ट हेड संचालक बूर्जीस गोदरेज यांची मुख्य उपस्थिती असेल. फालीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरुपात शेतकऱ्यांशी संवाद साधला. फालीच्या आठव्या संम्मेलनाच्या प्रायोजकांचे प्रतिनिधींनी संवाद साधला. जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संम्मेलनाचे प्रायोजक असून जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे.
चौकात छोटीशी चहाची टपरी चालवून जेमतेम कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. गावात जो तो त्यांना टेन्या नावाने बोलवित होते. परंतु जैनचे उच्च तंत्रज्ञान, टिश्यूकल्चर केळी यांचा स्वीकार केला आणि साधा चहा विकणारा टेन्या वर्षाला एक कोटी रुपयांची केळी पिकवू लागला. सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. साधा चहा विक्रेता अल्पावधित इतकी मोठी झेप कशी घेऊ शकतो. त्यांच्या शेतीला अनेकांनी भेटी दिल्या. त्यांच्या भारतभरातील आघाडीच्या दैनिकातून यशोगाथा प्रकाशित होऊ लागली. ही किमया केवळ जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानामुळे साध्य होऊ शकली. या बाबतची प्रांजळ कबूली टेनू बोरोले देतात. टेनू बोरोले जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी या छोट्याशा गावातील शेतकरी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. ते म्हणाले की, आमची आर्थिक परिस्थिती पूर्वी अगदीच जेमतेम होती. वडिलोपार्जित दीड एकर शेती होती परंतु ती शेती करणे परवडत नव्हती त्यामुळे ती तशीच सोडून दिली होती. त्यात काहीही पिकत नव्हते. चरितार्थ चालावा म्हणून इतरांकडून उधार उसनवारी करून काही भांडी कुंडी विकत घेऊन गावातल्या चौकात चहाचे दुकान सुरू केले. चहाचा व्यवसाय चांगला चालला. दोन पैसे साठवले आणि वडिलोपार्जित शेतीच्या जमिनीची प्रत सुधारली.
पहिल्याच प्रयत्नात केळीचे खोड आणि मोकाट पद्धतीने सिंचन पद्धतीचा अवलंब केला. त्यात जेमतेम उत्पादन मिळाले. मिळालेले पैसे शेतीत टाकायचे आणि आपल्या शेतीसोबतच भाडेतत्त्वाने काही शेती घ्यावी असे ठरविले. जैन टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड केली तर केळी ११ महिन्यात काढणीला येते व दुप्पट पिकते ही माहिती त्यांना मिळाली. पहिल्याच वेळी त्यांनी १० हजार टिश्युकल्चर केळी रोपांची नोंदणी केली. धाडस तर होते परंतु यातून ते लखपती बनले, भाडेतत्त्वावरचे क्षेत्र वाढविले. आजमितीस त्यांच्याकडे ५० एकर क्षेत्र असून दर वर्षी जैन टिश्युकल्चरची सुमारे ६० हजार रोपांची लागवड आपल्या शेतीत करतात. वर्षाला कोट्यवधी रुपयांची केळी पिकविणारे आणि टेन्याचे टेनुशेठ असा प्रेरणादायी प्रवास शेतकऱ्यांच्याच तोंडून ऐकल्यामुळे विद्यार्थी खूप प्रभावीत झाले. सुत्रसंचालन रोहिणी घाडगे यांनी केले.
कृषिसंबधित प्रकल्पांना भेटी -दरम्यान काल दि. ३ जून रोजी फालीच्या दुसऱ्या सत्रासाठी सहभागी सुमारे ४०० विद्यार्थ्यांचे ६० शिक्षकांचे आगमन झाले. ४ जून रोजी फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी जाणून घेतले. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड कशी केली जाते, याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवारफेरीतून टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर अॅण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.
आज कृषि व्यवसाय योजना, इन्होवेशनचे सादरीकरण : फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स आज सादर करतील. बडी हांडा हॉल, परिश्रम, गांधी तीर्थ सभागृहात सादरीकरण होईल. तसेच आकाश मैदानावर दुपारी ११.३० ला नाविन्यपूर्ण इन्होवेशन मॉडल्स यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. यातील विजेत्या स्पर्धेक गटांना पारितोषिक देण्यात येतील. याप्रसंगी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी सुसंवाद साधतील. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन आणि गोदरेज अॅग्रोवेट स्पेशल प्रोजेक्ट संचालक बूर्जीस गोदरेज विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधतील.