कारवाईविना वाळूचे वाहन सोडले? – तलाठ्यास कारणे दाखवा नोटीस

जळगाव : वाळू वाहतुक करणा-या वाहनाची पडताळणी न करता तसेच त्यावर कुठलीही कारवाई न करता चिरीमिरी करुन ते सोडून दिल्याच्या आरोपाखाली एरंडोल तालुक्यातील वैजनाथ टाकरखेडा येथील तलाठ्यास एरंडोल तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तलाठी दिपक ठोंबरे असे सदर तलाठ्याचे नाव आहे. माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या प्रकरणाचा केलेला पाठलाग आणि कारवाई होण्यासाठी केलेला पाठपुरावा या नोटीसीमागे दडला आहे. वाळूने भरलेले वाहन चिरीमिरी घेत सोडून दिल्याबाबतचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या आरोपाचे पत्र दीपककुमार गुप्ता यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन सादर केले. या पत्राची दखल घेत एरंडोल तहसीलदार यांनी तलाठी दिपक ठोंबरे यांना नोटीस बजावली आहे.

दिपककुमार गुप्ता यांनी विभागीय महसुल आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, अप्पर जिल्हाधिकारी जळगाव आदींना दिलेल्या तक्रारीनुसार 2 जून 2022 रोजी दुपारी एक ते अडीच वाजेच्या सुमारास मौजे वैजनाथ टाकरखेडा ता. एरंडोल येथे वाळूने भरलेले डंपर (जीजे 24 व्ही 0569) तलाठी दिपक ठोंबरे यांना मिळून आले होते. इश्वर (बापू) पाटील यांच्या मालकीचे सदर वाहन हॉटेल भवानी जवळ चिरीमिरी घेतल्यानंतर सोडून देण्यात आल्याचे गुप्ता यांनी म्हटले असून तसे चित्रीकरणात दिसत आहे. जिल्हाधिका-यांच्या पत्र क्रं. गौणख ई कावि/ 2022/8/26/604 दि. 26/5/2022 अन्वये गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुकीसाठी महाखनिज या संगणकीय प्रणालीचा वापर करण्याबाबत तलाठ्यांना अवगत करण्यात आले आहे. मात्र गुप्ता यांच्या तक्रारीनुसार सदर वाहनावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता ते वाहन सोडून देण्यात आले आहे. तलाठी ठोंबरे यांनी 2 जून 2022 रोजी गौण खणिज परवाना तपासला असल्यास महामायनिंग प्रणालीवरील लॉगिनची पडताळणी करण्यात यावी तसेच प्रशासकीय पातळीवर चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीच्या आधारे एरंडोल तहसीलदारांनी तलाठी ठोंबरे यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जर सदर वाहन (जीजे 24 व्ही 0569) अवैध आढळून आल्यास त्यावर एका दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर बाब गंभीर असून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करण्यात येवू नये याबाबतचा लेखी खुलासा दोन दिवसात सादर करण्याची सुचना तलाठी ठोंबरे यांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here