महाराष्ट्राने “मे” महिन्याच्या पूर्वार्धात खळखट्याकचा तणाव अनुभवला. जूनच्या मध्यावर मात्र मान्सून पूर्व पावसाचा आल्हाददायक शिडकावा अंगावर घ्यावा तसा लठ्ठालठ्ठीस सदैव सज्ज असणाऱ्या सज्जनांना परस्परांच्या प्रेमाचे आलेले भरते पाहून संपूर्ण महाराष्ट्र आनंदानं न्हावून निघालाय. सध्या महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण आहे. काही महिन्यापासून महाराष्ट्र अयोध्येशी जोडला गेल्याचे दिसतंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रमाणे मुंबई – अयोध्या अशी नवीन स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा कोणता राजकीय पक्ष करतो तेच बघायचं बाकी आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील रोमहर्षक संघर्ष बघायला मिळाला. त्याचा उत्तरार्ध आता राज्य विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय. आपल्या देशात आणि राज्यात लोकशाही असल्याने लोकांच्या कल्याणासाठी राजकीय पक्ष स्पर्धा करताना दिसत आहेत. पूर्वीच्या राजेशाहीत प्रचंड तलवारधारी सैन्याची लढाई होत असे. परस्परांचे सैन्य कापून काढून राज्य जिंकण्याचा खेळ चाले. महाभारत – रामायण काळापर्यंत आपण हा खेळ अनुभवला. केवळ पाच गावे पांडवांना देण्याचे नाकारुन घडलेले महाभारत भाऊबंदकीतील दुश्मनी कसा विध्वंस घडवते ते सर्वांना ज्ञात आहे.
एक वचनी – एक वाणी प्रभू श्रीरामांचा आदर्श आजही आम्ही पाळतो हे दर्शवण्यासाठी भगवी उपरणे लपेटून अयोध्येत धावाधाव करणारी महाराष्ट्रीय नेतेमंडळी हिंदुत्वाचा झेंडा तो आमचाच म्हणून गर्जना करताहेत. यात ठाकरे घराणे विरुद्ध भाजपा अशी स्पर्धा जनतेच्या मनास स्पर्श करुन गेली. या दोघातच आताशा राज्य विधान परिषदेच्या 11 जागा लढण्यावरुन “घमासान” सुरु झाल्याच्या वार्ता मात्र वार्याची थंडगार झुळुक अंगावर यावी तशा सुखावतात. भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस या राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना “फाइव्हस्टार” मेजवानीचा पाहुणचार दिलाय. सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये दररोज भाडे आणि अडीच ते पाच हजार रुपये “थाली”चे “इच्छाभोजन” अशा शाही आदरातिथ्याचा बेत सर्वांनी ठेवल्याचे बाहेर येणाऱ्या बातम्यात म्हटले आहे. स्वपक्षीयांपेक्षाही छोट्या राजकीय पक्षांचे अपक्ष आमदार यांच्यासाठी तर रेड कार्पेट घालून झाले आहे. एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांनी “खिलाओ पिलाओ दोस्ती बढाओ” असा सर्वांना जणू मैत्रीचा संदेशच दिला आहे. भाजप-शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे चार राजकीय पक्षांचे आमदार चार वेगवेगळ्या ठिकाणी फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये सुरक्षित निगराणीत असले तरी भोजनासाठी सर्वांना खुले आमंत्रण आहे. म्हणजे काँग्रेसवाला भाजपवाल्याकडे आणि भाजपवाला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनावाल्याच्या इच्छाभोजन अन्नछत्रयात्रेत सहज भोजन तृप्तीचा आनंद घेऊ शकतो. या भोजन तृप्ती सोबत गुलाबी कागदावरील गांधीबाबाच्या आशीर्वादाची पोतीच्या पोती भरुन बिदागी हवी तेथे पोचवून देण्याची सर्वांची तयारी असल्याची “संजय वार्ता” ऐकून आम्हा जनतेचे कान तृप्त झालेत.
पाऊस बरसण्यापूर्वी ढगांचा गडगडाटाने वनात थुई थुई नाचणाऱ्या मोराला जसा आत्मानंद होतो तद्वतच असल्या संजयवार्तांनी सुमारे तीस आमदारांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. “हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा” अशी चॅलेंज देणारी मंडळी “हमसे जो हाथ मिलायेगा चाहे जो पायेगा – थैला भरभर घर ले जायेगा” अशा “दोस्ती”च्या गोष्टी करु लागली आहे. दुश्मन – दुश्मन दोस्तो से भी प्यारा है अशी ही मधुर वेळ राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीने या सर्वांवर आणली आहे. फक्त एक जास्तीची जागा कोण जिंकतो? कोणाची प्रतिष्ठा वाढते? कुणाला घरघर लागते? असा हा जीवघेणा खेळ. “पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा” ओढण्याची साठमारी. कुणीतरी एक पक्ष जिंकेल – एक हरेल. महाराष्ट्राच्या 15 कोटी जनतेला काय मिळणार? ज्यांना काहीच काम धंदा मिळत नाही – रोजगार नाही त्यांनी एकतर उपाशी मरावे किंवा दयाधनांनी दिलेली मोफत भोजन थाली मिळवून जीव वाचवावा एवढेच.
महाराष्ट्रात फार पूर्वी भिकारी सुद्धा शिळेपाके अन्न मागून पोट भरत. जगण्याची शर्यत अर्धपोटी जिंकल्याच्या खुशीत उद्या मात्र पोटभर मिळवू या आशेवर ते जगत. आता इथल्या कोट्यावधी लोकांच्या हाताला काम हवे आहे. भीक मागून जगण्यापेक्षा कष्ट करुन जगण्याची त्यांची स्वप्ने आहेत. सध्याच्या व्यवस्थेत शेती करुन जगता येत नाही म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी, मुलाबाळांचे संगोपन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर अपत्ये विकणारी जोडपी, ऊस तोडीचे काम मिळावे म्हणून गर्भाशय काढून टाकणा-या बीड जिल्ह्यातील महिला यांच्या मनातल्या आर्त किंकाळ्या राज्यकर्त्यांना ऐकू येत नाही का? अनेक राज्यात विधानपरिषदा नाहीत. तरी त्यांचा कारभार चालू आहे. पाच लाख लोकसंख्येच्या जनसमूहातून जिंकून आमदार होता येत नाही, जे जिंकून आमदार होतात त्यांना घरात बसवून विधान परिषदेच्या “बॅक डोअर एंट्री” वाल्यांना मंत्री पदे दिली जातात. हा खेळ कशासाठी? सत्तेच्या राजकारणात जरब बसवण्यासाठी आमदारांचे एकगठ्ठा राजीनामे खिशात घालून त्यांना गप्प बसवण्याची मुस्कटदाबी कशासाठी? आता तर हिंदुत्वाच्या “सातबारा” वर वारसा हक्काची नोंद करण्याचा खेळ सुरु झाला आहे. हा सारा जनतेसाठी घातक खेळ आहे. पण त्याची सध्या कुणालाच पर्वा दिसत नाही. “लोकशाही”ने पाच वर्षाच्या कराराने दिलेले सत्तेचे टेंडर मिळवणे – राबविण्यासाठी हा त्यांचा आटापिटा. सलामत रहे दोस्ताना हमारा, भाड मे जाये सारा जमाना हेच फलित कुठवर मिळवायचं?