महाराष्ट्रात गाजत असलेल्या मविआ सरकार मध्ये सामील शिवसेनेत शिंदे गटाच्या 39 आमदारांनी वेगळी म्हणजे सरकार पाडण्याला पोषक भूमिका घेतल्याने आज तीस जून ला विधानसभा सभागृहात अत्यंत घाईघाईने विश्वासमत घेतले जात आहे आतापर्यंत हे सरकार अल्पमतात आल्याचा दावा करणाऱ्यांनी सरकारने बहुमत गमावल्याचे सिद्ध होण्याआधीच “मविआ” सरकारलाच तातडीने विश्वासमत सभागृहात सिद्ध करून दाखवा म्हणून सांगण्यात आले आहे. याबाबत सध्याच्या सरकार मधून बाहेर पडू पाहणारा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघेही शिवसेनेवर आमचाच हक्क असा दावा करताहेत. बंडखोर म्हटले गेलेले एकनाथ शिंदे गटाची गुजरात, आसाम आणि आता गोवा विमान यात्रा फाइव्हस्टार सहल झाली. त्या पुर्वीच राज्यसभा विधानसभा निवडणुकांमध्ये याच आमदार मतदारांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी हॉटेलमध्ये कडेकोट पहाऱ्यात ठेवल्याचे जनतेने पाहिले. म्हणजेच बाउंसर्स lचा पहारा बसल्याशिवाय लोकशाहीचा खेळ पूर्ण होत नाही.
आपल्या सभोवताली वावरणारी समाजजीवन राजकारणातील सर्व मंडळी हसऱ्या चेहऱ्याने बोलतांना दिसते. खोल खोल मनात भावनांचा सागर उसळला असला तरी मनावर ताबा ठेवून प्रसंगाला शोभेल असा मुखवटा घेऊनच लोक वागतात. चेहरा सुंदर नसला तरी सौंदर्याचा मुखवटा चढवला जातो. काही लोक भावना लपवण्यात वस्ताद असतात. चेहरा सत्य सांगतो असे म्हणता.त काही लोक एवढे तरबेज असतात की इस्त्री केल्यासारखा चेहरा ठेवून त्यांच्या मनातले कट-कारस्थान कपट नाराजी संतापाचा थांगपत्ता लागू देत नाही. एखादी तरी स्मित रेषा चेहर्यावर उमटू न देता आम्ही आपलेच अशा बनेल चेहरा हाच मुखवटा वापरून दोन्ही डगरीवर हात कसे ठेवतात ते शिवसेनेच्या ठाकरे शिंदे गटात वावरणा-यांपासून शिकायला हवे. चेहर्यापेक्षा मुखवटा हाच धोकेबाज असल्याचे सांगतात. आताही राज्यात “मविआ”त सामील शिंदे गटाने 2019 पासून मंत्रिपदाची सत्ता उपभोगली आता मात्र हिंदुत्वासाठी त्यांना मविआत सहभाग नकोय. उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावे हा आग्रह शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा टिळा लावावा असेही म्हणत आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 39 आमदार अधिक इतर असे पन्नास आमदारांची ताकद सांगत आहेत. त्यासाठी पन्नास ते सत्तर जणांचे लटांबर घेऊन गुजरात आसाम गोव्यात डोंगर झाडी हॉटेलचे फाइव्हस्टार लाइफस्टाइल जीवन जगून आले या शिंदे गटातही उद्धव ठाकरे यांचे ट्रोजन हॉर्स घुसवल्याचे सांगतात. या सहली वर सात हजार कोटीचा खर्च कोणी केला? शिंदे हे गटनेते मानले तर त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याची ईडी लावून चौकशी करा असे माजी खासदार खैरे म्हणताहेत. शिवसेनेतून फुटलेल्यांना रेडे, प्रेते, गद्दार म्हणून झाले. असे का म्हणतात? परत फिरा असेही का म्हणतात? असे विचारून झाले शिंदे गटाची मंडळी अजिबात ठाकरे यांच्या गटाकडे परतू नये म्हणून प्रवक्त्याकरवी शाब्दिक लाठीमार होत नाही ना? अशीही शंका पत्रपंडित व्यक्त करताना दिसत आहेत. या भांडणात संजय राऊत हे राकॉच्या गळ्यातले ताईत शिवसेना शरद पवारांच्या साथीने शिवसेना संपवायला निघाल्याचे नॅरेटीव्ह काही वर्षापासून जोरजोरात ऐकवले जात आहे. शिवसेनेवर असा आघात करणाऱ्यांना कठोरपणे हाताळणारे ॲक्शन घेण्याऐवजी चंबु गबाळे बि-हाड वाजलं आवरणारी “न धरी शस्त्र करी” कृती का व्हावी? कठोर ॲक्शन मोड ऐवजी “पाखरांनो परत फिरा” ची दाढी खाजव अर्जव कशासाठी? असे प्रश्न जनतेत विचारले जात आहेत. पहाटेच्या शपथविधी प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे उद्वेगाने म्हणाल्या होत्या की कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. आताही दादांना कोरोना झाला आहे. राज्यपालांनाही बाधलेला कोरोनाचा ज्वर उतरला. ठणठणीत हे उत्तमच. “मविआ” सरकार वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यावर उद्धवजींना 100 हत्तीचे बळ लाभल्याचे सांगतात. राकॉ काँग्रेसपेक्षा आमच्याच लोकांनी गद्दारी केल्याचे सांगून झाले. शरद पवारांची भाजपारुपी महा शक्तीशी पुकारलेल्या लढाईत खरंच त्यांना कोण किती प्रामाणिकपणे साथ देते ही लढाई टोकदार वळणावर येतांना औरंगाबाद संभाजीनगर हिंदुत्व लाईन वर कसे परत येता?
बंद हौदात सोडलेल्या पाण्यात बुडणारे माकड डोक्यावर पिल्लू घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करते पण डोक्यावरून पाणी जाऊ लागताच पिल्लू पायाखाली घेऊन स्वतःचा जीव वाचवते ही गोष्ट सर्वश्रुत आहे. शिवसेना आणि “मविआ”च्या सत्तेच्या अस्तित्वाची लढाई याच वळणावर दिसते. स्वार्थी मतलबी लोकप्रतिनिधींचे आजवरचे दिसलेले चेहरे हेच मुखवटे होते असे आता लोकांना वाटू लागले आहे. कोण इमानदार, कोण गद्दार याचा कस लागतोय. स्वाभिमानाच्याही गोष्टी करत आहेत. मविआचे सरकार पाडून कोणाला सत्ता हवी हेही लपलेले नाही. सत्ता कुणाला राखायची हेही उघड झाले आहे. आता कुणाकुणाचे मुखवटे गळून खरे चेहरे समोर येतात याचीच प्रतीक्षा!.