अमरावती : पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने विस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सन 2005 मधे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना आ. कडू यांच्याकडून हा प्रकार घडला होता. या प्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय (क्रमांक 1) चे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी हा निकाल दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख 5 ऑगस्ट 2005 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. बैठक कालावधीत आ. बच्चू कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मटकी फोडो’ आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाच्या वेळी आ. कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीअंती 4 जुलै रोजी निकाल देण्यात आला. न्यायालयाने कडू यांना वेगवेगळ्या कलमानुसार एकुण विस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.