गुडघ्यावर चुकीचा उपचार करणा-या डॉक्टरला दोन लाख दंड

On: July 7, 2022 12:31 PM

जळगाव : गुडघेदुखीचा त्रास असणा-या जळगावच्या महिलेने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील कुठलीही पदवी नसलेल्या डॉक्टरकडे शस्त्रक्रिया केली. मात्र गुडघ्यात चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेचा त्रास कमी होण्याऐवजी तो वाढला. अखेर सदर महिलेने जळगाव शहरातील एका डॉक्टरकडे शस्त्रक्रिया केली. जळगावला शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेची गुडघेदुखी थांबली मात्र तिला चार लाख रुपये खर्च आला. चुकीचा उपचार केल्याचा ठपका ठेवत सदर डॉक्टरला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश अकोला ग्राहक मंचाने पारीत केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कल्पना माधवराव गवांदे या महिलेस गुडघेदुखीचा त्रास होता. कल्पना गवांदे त्यांनी तेल्हारा येथील डॉ. द्वारकादास नारायण राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये गुडघेदुखीवर वैद्यकीय उपचार केले. डॉ. द्वारकादास राठी यांनी सदर महिलेच्या गुडघ्यात एक इंजेक्शन दिल्यामुळे त्रास वाढला.

अखेर कल्पना गवांदे यांनी जळगाव येथील एका डॉक्टरकडून इलाज व शस्त्रक्रिया केली. गुडघ्यात इंजेक्शन दिल्याने सेप्टिक शॉक निर्माण केल्याचे निदान जळगाव येथील डॉक्टरांनी केले. जळगाव येथील त्या डॉक्टरचे चार लाख रुपयांचे बिल कल्पना गवांदे यांनी अदा केले. तेल्हारा येथील डॉ. राठी यांचा हलगर्जीपणा, सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचारामुळे गुडघेदुखीचा चुकीचा इलाज झाल्याचा आरोप करत गवांदे यांनी अकोला ग्राहक मंचाकडे प्रकरण दाखल केले. ग्राहक न्यायमंचाने या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकक यांच्याकडून वैद्यकीय अहवाल मागवला. या अहवालात डॉ. राठी यांच्याकडे अस्थिरोग संदर्भात कुठलीही पदवी, प्रमाणपत्र आढळून आले नाही. तरीदेखील डॉ. राठी यांनी रुग्ण गवांदे यांच्यावर उपचार केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी युक्तिवादानंतर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी, उदयकुमार सोनवणे यांनी डॉ. द्वारकदास नारायण राठी यांनी गुडघेदुखीची रुग्ण कल्पना गवांदे यांच्या उपचारात हलगर्जीपणा, सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचार केला असल्याचा निर्वाळा दिला. सदर निर्वाळा देत असतांना रुग्णास झालेल्या त्रासापोटी दिड महिन्याच्या आत दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. निर्धारित कालावधीत रक्कम दिली नाही तर 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्याचे आदेश डॉ. राठी यांना देण्यात आले आहे. कल्पना गवांदे यांच्यावतीने अ‍ॅड. मोहम्मद इलियास शेखानी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment