पंढरपूर : शनिवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या परिवारासह पंढरपुरात दाखल झाले. आज पहाटे विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापुजा त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत, नातू रुद्रांश अशा चार पिढ्या हजर होत्या. एकत्रीतपणे चार पिढ्या विठ्ठलाच्या महापुजेला हजर राहण्याचा योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. बीड जिल्ह्याच्या गेवराई येथील नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (52) व जिजाबाई मुरली नवले (47) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत शासकीय महापूजा केली.
शनिवारी उशिरा रात्री पंढरपुरला दाखल झालेल्या शिंदे यांनी विश्रामगृहात एका कार्यक्रमास उपस्थिती दिल्यानंतर विठ्ठल मंदीरात परिवारासह आगमन केले. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. राज्यात नगरपालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे अर्थातच आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुर दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. अटी शर्थीवर निवडणूक आयोगाने या दौ-याला परवानगी दिली. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमात कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करता येणार नाही अशा प्रमुख अटींचा यात समावेश आहे.